Naxal Movement:   देशात नक्षलवादाची पीछेहाट झाली असून नक्षलग्रस्त भागात पोलीस आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या वर्चस्वामुळे नक्षल चळवळ कमकुवत झाली आहे, अशी अप्रत्यक्ष कबुली पहिल्यांदाच खुद्द नक्षलवाद्यांनी दिली आहे. नक्षलवाद्यांनी 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान शहीद स्मृती आठवडा साजरा करा अशी सूचना दिली. या निमित्ताने नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने एक दस्ताऐवज जारी केले आहे. 


नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने जारी केलेले 24 पानी दस्ताऐवज 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहे.  या खास दस्ताऐवजामध्ये नक्षलवाद्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींना कबुली दिली आहे. मागील एका वर्षात देशातील वेगवेगळ्या भागात 97 नक्षली कमांडर्स पोलिसांसोबतच्या चकमकीत मारले गेले आहे, किंवा इतर कारणांनी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नक्षली चळवळीला मोठा धक्का बसल्याचं या दस्ताऐवजामध्ये कबूल करण्यात आले आहे. 


गेल्या काही काळात नक्षलवादाची पीछेहाट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली ही नक्षलवाद्यांनी या दस्ताऐवजात दिली आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये पोलिसांच्या अत्याधुनिक डिजिटल सर्विलेंस आणि इंटेलिजन्सचा सामना कशा पद्धतीने करायचा आहे, याचा एक रोड मॅप ही आपल्या कॅडर साठी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने मांडला आहे. 


नक्षलवाद्यांच्या दस्ताऐवजात काय म्हटले?


- गेल्या वर्षभरात पोलिसांसोबत चकमक, आजारपण आणि इतर कारणांनी देशभरात 97 नक्षली कमांडर मारले गेले आहेत.
- नक्षलग्रस्त भागात पोलिसांचे वाढते कॅम्पमुळे नक्षलींना त्यांच्या वर्चस्वाच्या भागांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 
- अत्याधुनिक आणि अद्ययावत टेक्निकल इंटेलिजन्समुळे पोलीस नक्षली कमांडरपर्यंत पोहोचून त्यांना अटक करत आहे किंवा त्यांना ठार करत आहेत.
- पोलिसांच्या अत्याधुनिक टेक्निकल इंटेलिजन्सचा सामना करण्यासाठी नक्षली कमांडर्सनी जुन्या ह्युमन इंटेलिजन्सचा अवलंब करावा अशी सूचना दिली आहे. 
- नक्षलग्रस्त भागात पोलिसांची वाढती संख्या आणि नक्षलींची कमी संख्या लक्षात घेता माओने अनेक दशकांपूर्वी दिलेला गोरिल्ला युद्ध तंत्राचा अवलंब करा असा सल्ला ही केंद्रीय समितीने नक्षली कमांडर्सला दिला आहे. 
- पोलिसांचे वाढते वर्चस्व लक्षात घेता एका ठिकाणी जास्त दिवस थांबू नका, विखरून राहा, सतत चालत राहा अशा सूचना ही कमांडर्सला दिल्या आहेत. 



नक्षली चळवळींचे एकत्रीकरण


बंदुकीच्या जोरावर अन्यायकारी व्यवस्था उलथवून टाकण्याच्या उद्देश्याने नक्षलवादी चळवळ सुरू झाली. पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये चारू मुझुमदार यांच्या नेतृत्वातील शेतमजूर-कष्टकऱ्यांच्या सशस्त्र संघर्षाने जमिनदारांच्या छळापासून सुटका झाली. देशभरातही सशस्त्र क्रांती हाच मार्ग असल्याचा दावा अतिडावा समजला जाणारा एक 1967 च्या सुमारास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडला. त्यानंतर पुढे ही चळवळ नक्षली चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली. पीपल्स वॉर ग्रुप आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोन प्रमुख नक्षली चळवळींचे 2004 मध्ये एकत्रीकरण झाले आणि माओवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली. भारत सरकारने माओवाद्यांवर बंदी घातली आहे.