Chhgan Bhujbal : महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) पायउतार झाल्यानंतर शिंदे फडणवीस यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) सरकार स्थापन केले. त्यानंतर लागलीच महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या नेत्यांची अतिरिक्त सुरक्षा काढण्यात आली. आता याच शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते सामील झाले आहेत. यात छगन भुजबळ देखील आहेत. त्यावेळी छगन भुजबळांची देखील सुरक्षा काढून टाकण्यात आली होती. आता छगन भुजबळ सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या धमकीनंतर वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात अली आहे.
राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट बाहेर पडल्यानंतर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी शिंदे- भाजप सत्तांतरानंतर भुजबळांसह अनेकांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र मंत्रिपद मिळाल्याने छगन भुजबळांना 'वाय प्लस' सुरक्षा पुरविण्यात येत आहे. नुकताच त्यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याने नाशिक शहरातील निवासस्थानाबाहेरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अजित पवार यांना बंडात साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात फोनवरून सोमवारी रात्री जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी सकाळी पुणे पोलिसांनी महाडमधून एकाला ताब्यात घेतले.
'काय असते 'वाय प्लस' सुरक्षा ?
एक्स, वाय, वाय प्लस, झेड, झेड प्लस आणि एसपीजी संरक्षण अशा सहा सुरक्षा प्रणाली आहेत. यापैकी 'वाय प्लस' (Y+ Security) दर्जाच्या सुरक्षेत 11 सुरक्षा कर्मचारी म्हणजे स्थानिक पोलिस असतात. यासह 2 ते 5 विशेष सुरक्षा कर्मचाऱ्यांचा (एसपीओ) समावेश असतो. 'वाय' सुरक्षेत 2 एसपीओ व एस्कॉर्टसह पोलिस असतात. यानुसार 'वाय प्लस' ताफ्यात पायलट व्हॅन, एसपीओ व्हॅन, पोलिस व्हॅन (एक्सॉर्ट) यांचा समावेश असतो. 'वाय प्लस, 'वाय' सुरक्षा लागू असलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानीही गार्ड दिले जातात. तर, 'वाय' सुरक्षेत पायलट व्हॅन पुरवण्यात येत नाही. त्यानंतर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने छगन भुजबळ यांच्या शहरातील निवासस्थानासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यापासूनच दोन्ही ठिकाणी पोलिस नेमण्यात आले आहेत. मात्र, धमकीच्या प्रकरणानंतर त्यात काहीशी वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, मंत्री भुजबळ यांना आता 'वाय प्लस' सुरक्षा असल्याचेही आयुक्तालयाने स्पष्ट केले.
2023 मध्ये 'एक्स' सुरक्षा
शिंदे भाजप सत्तास्थापनेनंतर शिंदे गटाच्या आमदारांसह खासदारांच्या सुरक्षेत जुलै 2022 मध्ये वाढ करण्यात आली होती. तेव्हा, खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांना 'वाय प्लस' सुरक्षा लागू झाली. मात्र, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची 'वाय प्लस' सुरक्षा हटवून 'एक्स' करण्यात आली होती. त्यामुळे भुजबळांना पोलिसांकडून केवळ दोन अंगरक्षक पुरविण्यात येत होते.
इतर महत्वाच्या बातम्या :
Chhagan Bhujbal : पवार कुटुंबीय धमक्या देण्याचे काम करत नाही : छगन भुजबळ