Pik Vima: मराठवाड्यात या वर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 3 लाखांची घट झाली आहे. सरकारने दिलेल्या 31 जुलैपर्यंतच्या मुदतीत 77.40 लाख शेतकऱ्यांनी 49.67 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांची संख्या 80.44 लाख होती. पीक विमा मिळण्यास येणाऱ्या अडचणींमुळे यंदा शेतकऱ्यांनी योजनेची नोंदणीच न केल्याचं दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी 3.44 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसल्याचे समोर आले आहे.
मराठवाड्यात मागील काही वर्षांत कधी दुष्काळ तर कधीकधी अतिवृष्टी यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही, अशी अवस्था होती. तर दुसरीकडे पीक विमा भरल्यानंतरही केवळ नुकसानाची माहिती दिली नसल्याचे कारण पुढे करीत विमा कंपन्यांकडून पीक विमा नाकारला जात आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा वगळता इतर 6 जिल्ह्यांमधून सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
मराठवाड्यात पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
दरम्यान, शासनाने १ रुपयामध्ये पीक विमा जाहीर केला. त्यानुसार मागील वर्षी मराठवाड्यातील ८०.८४ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र अनेक ठिकाणी २१ दिवसांचा पावसाचा खंड या निकषावर बोट ठेवत विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली त्या ठिकाणी केवळ २ ते ५ हजार रुपयांचाच विमा मंजूर केला आहे.
या वर्षी मराठवाड्यात पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांनी ४९.६७ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विम्यास प्रतिसाद कमी मिळाला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती काढला पीक विमा?
संभाजीनगर- 11,40,876
बीड - 17,17,176
जालना- 9,13,977
धाराशिव- 7,19,100
हिंगोली - 4,78,330
लातूर - 8,87,133
नांदेड - 11,20,854
परभणी - 7,63143
आत्तापर्यंत 1 कोटी 56 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला
कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला होता. यावर्षी मात्र, यामध्ये घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी आत्तापर्यंत 1 कोटी 56 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत मागील वर्षी 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याची संधी शेतकऱ्यांना देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या हिश्शाचा प्रिमीय राज्य सरकारनं भरला होता. दरम्यान, कृषी विभाग आणि विमा कंपीनीने यातील अनेक बनावट प्रकार समोर आणले आहेत.
अनेक गैरप्रकार आले समोर
मागील वर्षी अनेक ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आले होते. एका शेतकऱ्यांच्या जमिनीवर पसस्पर दुसऱ्याने विमा काढणे, शासकीय जमिनीवर विमा काढणे, अकृषक क्षेत्रावरील पिकांचा विमा काढणे, मंदिर कसेच अन्य धार्मिक स्थळांवरील जमिनीवरील पिकांचा विमा काढणे, सार्वजनिक संस्थाच्या जमिनीवरील पिकांचा विमा काढणे, जास्त क्षेत्राचा विमा काढणे, सामायिक क्षेत्रावर पसर्पर विमा उतरवणे, एकाच बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचा विमा काढणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळं यावर्षी पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे दिसत आहे. यावर्षी या योजनेते 10 लाख शेतकरी कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: