अकोला : अकोला जिल्ह्यातील (Akola News) बाळापूरमध्ये अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल (Akola Crime) करण्यात आले आहेत. 'एचडीएफसी अर्गो' या विमा कंपनीचे राज्य प्रतिनिधी प्रकाश श्रीवास्तव आणि विभागीय प्रतिनिधी सुनिल भालेराव या दोघांवर काल रात्री हे गुन्हे दाखल झाले आहेत. 'एचडीएफसी अर्गो' कंपनीने वर्ष 2023-24 मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला अनेकदा मागणी करूनही सादर केली नाहीत. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दावा यादी, सर्वेक्षण झालेली यादी, पात्र आणि अपात्र यांची कारणांसह यादी, खरीप आणि रब्बी पंचनामे प्रतीसह इतर दस्ताऐवज कंपनीने कृषी विभागाला सादर केले नाहीत.
यामूळे बाळापूर तालुक्यातील 7 हजार 556 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य परतावा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं. परिणामी, कंपन्यांनी परतावा न देतांना राज्यात हजारो कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) केला होता.
'एचडीएफसी अर्गो' कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल
तर दुसरीकडे काल गुरुवारी बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी पिकविम्याच्या विषयावर बाळापूरचे तहसीलदार आणि तालूका कृषी अधिकाऱ्यांना बाळापूर नगरपालिकेच्या मुख्य सभागृहात कोंडलं होतं. विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत आमदार देशमुखांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला विमा कंपन्यांचे अधिकारी गैरहजर असल्याने आमदार देशमुख चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी तब्बल दहा तास या अधिकाऱ्यांना डांबल्यानंतर कृषी विभागाने कंपनीविरोधात पोलीस तक्रार केलीय.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही आमदार देशमुखांनी टीका केलीय. तर आता याच प्रकरणी जिल्हा कृषी अधिक्षक शंकर किरवे यांच्या तक्रारीवरून कंपनीवर बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.
नेमकं प्रकरण काय?
शेतकऱ्यांच्या पीकविमाबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, कुणाला विमा उतरवताना अडचणी येत आहेत तर काही तांत्रिक कारणं आहेत. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. नगरपालिकेत ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे नितीन देशमुख प्रचंड संतापले. त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं.
जोपर्यंत विमा कंपनीचे पदाधिकारी याठिकाणी येत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढच नाहीत तोवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,सर्व दरवाजे लावून घ्या असंही आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि तक्रारी आहेत. अनेक शेतकऱ्यांना विम्याचे पैसै मिळात नाहीत. तर अनेकांना पीक विमा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्यांनी या बैठकीला उपस्थित न राहिल्याने देशमुखांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवल्याचं समोर आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या