रब्बी असो की खरीप बोगस बियाणे आणि खतांचे शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं संकट असते. त्यामुळेच बहुसंख्य शेतकऱ्यांचा ओढा हा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बियाण्यांकडे असतो. मात्र, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं सोयाबीनचं प्रसिद्ध वाण एमएयुएस-71 अप्रमाणित असल्याचा धक्कादायक अहवाल महाबीजने विद्यापीठाला दिलाय. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खरीप 2018-19 मध्ये हजारो शेतकऱ्यांना हेच अप्रमाणित बियाणाचं वाटप झालंय. मात्र, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारावर पडदा पडला होता. परंतु, काही शेतकरी आणि परभणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती यांनी याबाबत तक्रार करुन थेट राज्यपालांकडे कारवाईची मागणी केल्याने विद्यापीठाचं हे पितळ उघड पडलं.
संशोधन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह -
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संचालक संशोधन विभाग मध्यवर्ती प्रक्षेत्रावर विविध प्रकारची पीकं घेऊन त्यावर प्रक्रिया करत असतात. यातून नवीन बियाणे विकसित करुन यातील काही प्रकारची बियाणे हे थेट शेतकऱ्यांना देतात. तर, काही प्रकारची बियाणे हे महाबीजला बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यासाठी देत. मागच्या खरीप हंगामातही विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीनच्या एमएयुएस-71 या वाणाचे मोठ्या प्रमाणावर बियाणे हे महाबीजला देण्यात आले होते. महाबीजने या बियाणांचे वाटप शेतकऱ्यांना केले. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या तेव्हा महाबीजने तिथे जाऊन त्याची तपासणी केली. त्यावेळी विद्यापीठाचे बियाणे हे अनुवांशिक शुद्धता न करताच तयार केले गेले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाबीजचा पुर्ण बीजोत्पादन कार्यक्रम बाद झालाय. त्याच्याबाबत त्यांनी सविस्तर अहवाल विद्यापीठाला दिला आहे. विद्यापीठाने झालेली चुक मान्य करत अधिकाऱ्यांना केवळ समज देऊन पुढे अशा घटना होऊ नये, अशी ताकीद दिल्याचे कुलगुरू सांगताहेत.
कृषी विद्यापीठं पांढरा हत्ती होतायेत -
कृषी विद्यापीठ हे केवळ पांढरा हत्ती झालेत, त्यांचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना होत नाही. अनेकवेळा हे सिद्ध झालंय, बियाणे नापास होण्यामागे खासगी कंपन्यांसोबत असलेले हितसंबंध कारणीभूत असल्याचा आरोप आता होत आहे. त्यामुळे या सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ, कुलगुरुंवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना पायाभुत बियाणांचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. अनुवांशिक दृष्ट्या शुद्ध बियाणे शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवता येईल. मात्र, जर विद्यापीठातील शास्त्रज्ञच अशा प्रकारे अनुवांशिक चाचणी न करता थेट अशुद्ध बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचवत असतील तर शेतकऱ्यांनी नेमका विश्वास ठेवायचा कुणावर, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
संबंधित बातमी - राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, नागपूर आणि अमरावतीत गारपीट
Marriage Issue | विदर्भातील शेतकरी मुलांना नवरी मिळेना | नागपूर | ABP Majha