नागपूर : नववर्षाच्या सुरवातीलाच अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात वाशिम, नांदेड, यवतमाळ, हिंगोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली आहे.

नागपूरात गारपीट

नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक, शिवाय कळमेश्वर तालुक्यातील मोहपा आणि सावनेर तालुक्यातील खापा परिसरात या गावांत पहाटेच्या सुमारास गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या या गारपिटीमुळे काही घरांच्या छताचे नुकसान देखील झाले आहे. तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आंबिया आणि मृग बहरातील संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला, कपाशी, गहू, चना पिकाचे नुकसान झाले आहे.

अमरावतीत अवकाळी पाऊस, आणि गारपीट

अमरावती जिल्ह्यात रात्री अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील तूर, कपाशी आणि रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकांचे नुकसान झाले आहे. परतवाडा, अंजनगाव सुर्जी, धारणी आणि तिवसा या तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे.



यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचा हंगाम धोक्यात आला असून गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान झाले आहे. मागिल दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर कालपासून झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि तूर हे पिक धोक्यात आलं आहे. 2019मध्ये झालेल्या आवकाळी पावसाचा फटका खरीप हंगामाला बसला होता. त्यामुळे कापुस आणि सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यात आताल रब्बी हंगामात अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला असून शेतकर्यांचे आर्थिक गणितसुद्धा बिघडत चालेले आहे.

हिंगोलीत मुसळधार पाऊस

हिंगोली शहरात आज सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तींची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तर जिल्ह्यातील इतरही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. नववर्षातील पहिल्याच अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या तूर पिकाचे आणि शेतातील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.