लातूर : अखिल भारतीय  95 वे साहित्य संमेलनाचे उदगीर येथे आयोजन केले आहे. अवघ्या दोन दिवसानंतर साहित्यिकाची मांदियाळी उदगीरात दाखल होणार आहे. साहित्य संमेलनासाठी   भारतरत्न लता मंगेशकर साहित्य नगरी सज्ज करण्यात आले आहे. 36 एकर परिसरात सात ठिकाणी व्यासपीठ ची निर्मिती करण्यात आली आहे


लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या 36 एकर भागात सात व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. यात मुख्य मंडप हा 80 हजार चौरस फुटाचा आहे. सीमावर्ती भाग असल्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणा या भागात साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. उदगीर तालुका आणि जिल्ह्याभरातील लोकांची वर्दळ वाढणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आयोजकांनी आसन व्यवस्था उत्तम ठेवण्यावर भर दिला आहे.


साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात भव्य मंडप असावा अशी अपेक्षा असते. मात्र सध्याचे उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता कापडी मंडपामुळे आलेल्या रसिकांना त्रास होईल. यावर उपाय म्हणून जर्मन हँगर मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. हा मुख्य मंडप जवळपास 80 हजार चौरस फुटाचा आहे. या काळात अवकाळी पाऊस जरी आला तरी कार्यक्रमात कोणतेही अडचण येणार नाही. उन्हाच्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य मंडपात एकावेळी किमान 10 ते 12  हजार जणांची बसण्याची व्यवस्था केली आहे.


साहित्य संमेलनातील मुख्य मंडपाच्या बाजूला इतर सहा व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. या सहा व्यासपीठावर कथाकथन, कविता,गझल कट्टा ,कवी कट्टा ,लोककला ,परिसंवाद तसेच मुलाखती यासारखे इतर ही कार्यक्रम पार पडणार आहेत


आठवे व्यासपीठ ठरणार आकर्षण


22 , 23 आणि 24 तारखेचे सात व्यासपीठ तयार होत आहेत. मात्र या व्यतिरिक्त आठवे व्यासपीठ तयार होत आहे. आठवे व्यासपीठ हे अजय -अतुल, अवधुत गुप्ते आणि चल हवा येऊ दे च्या सादरीकरण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या व्यासपीठाचा तयारी जोरात सुरू आहे. 20 तारखेला अजय अतुल यांची संगीत मैफिल  आहे. 21 तारखेला चल हवा येऊ दे चा फड रंगणार आहे. 24 तारखेला अवधूत गुप्ते हे सादरीकरण करणार आहेत. 


या कार्यक्रमात कोणतेही उणीव राहू नये यासाठी वेगवेगळे विभाग बनविण्यात आले आहेत. नियोजन चोख असावे यासाठी अनेकजण कष्ट घेत आहेत, अशी माहिती या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी दिली आहे


ऐन उन्हाळ्यात साहित्य संमेलन होत आहे. मुख्य मंडपाच नव्हे तर इतर सहा मंडपात ही रसिक प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. उन्हाच्या तीव्र झळा बसू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी कुलर,पंखे याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याची व्यवस्था काही ठराविक अंतरावर करण्यात आली आहे. लिंबू पाणी ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक रसिक साहित्यप्रेमी व्यक्तीला भर उन्हात ही सभा मंडपात आल्हादायक वाटले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो. कुठेही पाणी विजेची उपलब्धता यात काहीही अडचण होणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे. जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत "अशी माहिती रामचंद्र तिरुके यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या :