मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विवादीत वक्तव्याप्रकरणी तपास करण्याचे आदेश शिवडी दंडाधिकारी कोर्टानं भोईवाडा पोलीस ठाण्याला दिले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप नाना पटोले यांच्यावर करत भाजप युवा मोर्चानं त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. "मी मोदींना मारू शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले’’ असं नाना पटोले म्हणाले होते. पंतप्रधान हे देशातील एक घटनात्मक पद आहे. या पदाचा अपमान म्हणजे हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आपला निषेध व्यक्त केला होता.
याचसंदर्भात भाजप युवा मोर्चानं 18 जानेवारी रोजी मरीन ड्राइव्ह तसेच बांगुर नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दिली होती. मात्र, अद्याप नाना पटोलेंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर पोलीस उपायुक्त आणि भोईवाडा पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली. मात्र त्याचीही कोणतीच दखल न घेतल्याने अखेर भाजप युवा मोर्चाने शिवडी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली याचिका दाखल केली. या प्रकरणी दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता त्याची दखल घेत न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश भोईवाडा पोलिसांना दिले आहेत. तसेच त्याबाबत अहवाल 26 मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.