Marathi Sahitya Sammelan : यावर्षीचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होणार आहे. अवघ्या तीन दिवसांवर संमेलन येऊन ठेपलं आहे. दरम्यानच्या काळात संमेलनाच्या अनुशंगाने बैठका, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी आणि नियोजन झाल्याने आता संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. 


राष्ट्रपती आणि साहित्यिक यांच्या स्वागतासाठी उदगीर सजले 


या संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार असल्याने तयारी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने तयारीच्या अनुषंगाने विविध विभागांच्या बैठका घेऊन कामाच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या संमेलनासाठी शहरात आठ ठिकाणी हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्यात येत आहेत. उदगीर शहरातील रस्त्यांची डागडुजी, शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्याचबरोबर संमेलन स्थळावरील सभागृह उभारणी अंतिम टप्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती या संमेलनाला लाभणार असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे.  


स्वच्छता मोहिम वेगात 


उदगीर शहरातील मुख्य रस्त्यांसह, संमेलन स्थळ परिसरात स्वच्छता मोहिम जोरदारपणे राबविण्यात येत आहे. जागोजागी स्वछता करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक-तेलंगना या तीन राज्यांच्या सीमेवरील ऐतिहासिक उदगीर शहरात भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने आयोजकांच्या वतीने जोरदार प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे. 


साहित्यिकांसाठी वेगळे नियोजन 


या साहित्य संमलेनासाठी मोठ्या प्रमाणावर मराठी साहित्यिक आणि कवींना निमंत्रित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या मान्यवर लेखक, साहित्यिक, कवी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी उदगीर शहरासह, लातूर, नांदेड, देगलूर, कर्नाटक राज्यातील बिदर आदी ठिकाणी लॉज आरक्षित करण्यात आलेली आहेत. साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमी यांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. 


पदाधिकारी उदगीर येथे ठाण मांडून 


या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्यासह अनेक जण उदगीर येथे ठाण मांडून आहेत. जवळपास 36 एकर परिसरात मंडप उभारण्यात आला आहे. त्यामध्ये विविध सभागृह आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुख्य मंडपात 5000 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.  


महत्वाच्या बातम्या :