Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : लातूर येथील उदगीर येथे 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. साहित्यिकांबरोबरच संगीत क्षेत्रातील दिगग्ज, हास्य अभिनेते, कवी,  गझलकार, कथाकथनकार हे सभा गाजवणार आहेत. तीन दिवस साहित्यिक आणि राजकारणी नेत्यांची साहित्यावरील भाषणे या संमेलनात गाजणार आहेत.  


अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हटलं की पुस्तकांची लयलूट ठरलेलीच असते. याशिवाय वैचारिक चर्चा आणि विविध विषयांवरील परिसंवाद तसेच वक्त्यांची भाषणे याची उत्कृष्ट मेजवानीही असते. यावर्षी  उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी पार पडणार आहे. जेष्ठ साहित्यिक भारत सासणे हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत.  


साहित्य समेलनाचा मुख्य कार्यक्रम तीन दिवस असला तरी दोन दिवस अगोदरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य समलेन उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रागणात होत आहे. हे वर्ष महाविद्यालयाचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. त्या निम्मिताने याच प्रांगणात प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचा 20 एप्रिलला लाईव्ह कार्यक्रम असणार आहे. तर 21 तारखेला चला हवा येऊ देची संपूर्ण टीम येथे सादरीकरण करणार आहे.  


पहिला दिवस 


साहित्य समेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 एप्रिल रोजी सकाळी साडे सात ते 10 यावेळेत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.  यावेळी ग्रंथपूजन संमेलनाध्यक्ष भारत सासने यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही ग्रंथदिंडी संमेलनस्थळी दाखल होणार आहे.  


ग्रंथ दिंडीनंतर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडेल. विविध दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, चित्र शिल्प कला दालन, अभिजात मराठी दालन, गझल कट्टा, कवी कट्टा या सारख्या विविध उपक्रमांचे उद्घाटन पार पडणार आहे. 


मुख्य उद्घाटन सोहळा साडे दहा वाजता सुरू होणार आहे. यासाठी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हजर असणार आहेत. याशिवाय शिवराज पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण, सुभाष देसाई यांचीही हजेरी असरणार आहे. मावळते अध्यक्ष जयंत नारळीकरही या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर दिवसभर विविध विषयांवरील परिसंवाद पार पडणार आहेत. संध्याकाळी लोककला सादरीकरण होणार आहे.  


दुसरा दिवस 


 संमेलनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 तारखेला जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या मुलाखातीने संमेलनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. गझल कट्टा आणि कवी कट्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. याबरोबरच या दिवशी बालकवी संमेलनही होणार आहे. तसेच बाल कथाकथनचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उदगीर हे कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असल्यामुळे या भागातील निमंत्रीत कवींचे काव्यवाचन होणार आहे.  


तिसरा दिवस 


साहित्य संमेलनाच्या अंतिम दिवशी काही ठराविकच कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर चर्चासत्र, गझल कट्टा, कवी कट्टा आणि बालकांसाठी बालकांनी बनवलेल्या कथा आणि कविता वाचन होणार आहे.  
समारोप सोहळा दुपारी साडे तीन नंतर होणार असून यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित असणार आहेत.  


सगल तीन दिवस सतत कार्यक्रमात व्यस्त असलेल्या उदगिरकरांसाठी त्याच दिवशी संध्याकाळी अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजणीचा आस्वाद घेता येणार आहे.  


उदगीर सारख्या सीमावर्ती भागात अनेक साहित्यिक आहेत. येथील रसिकांना हे साहित्य संमेलन म्हणजे एक पर्वणी आहे. प्रत्येक क्षेत्रातील आणि स्तरातील रसिकांची आवड लक्षात घेऊन एक परिपूर्ण साहित्य संमेलन म्हणून उदगीर येथील साहित्य संमेलनाची नोंद व्हावी म्हणून अनेक जण कष्ट घेत आहेत, असे मत स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे. 


हे साहित्य संमेलन आमच्या उदयगिरी महाविद्यालयात होत आहे याचा आम्हालाच नव्हे तर येथील सर्व आजी आणि माजी विद्यार्थ्यांना आनंद होत आहे. हीरक महोत्सवी वर्षात साहित्य संमेलन होत आहे हा दुग्धशर्करा योग आहे. अनेक साहित्य रसिक मदतीला पुढे आले आहेत, असे मत कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले आहे.


महत्वाच्या बातम्या