Marathi Sahitya Sammelan : उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात जोरदार करण्यात आली आहे. यावेळी संमेलनाला अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. या दरम्यान, "आवडत नसलेले साहित्य जाळणे, बंदी घालणे योग्य नव्हे. सत्तेला माज चढतो, तेव्हा साहित्यावर निर्बंध लादले जातात. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणीला साहित्यिकांनी प्रखर विरोध केला. आज साहित्यात सत्ताधाऱ्यांना चिअर्स करणारे चिअर्स लिडर्स तयार झाले आहेत, हे दुर्दैव आहे" असे रोखठोक विधान 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख अतिथी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी केले आहे. 


यावेळी लेखक हा बंडखोरच असला पाहिजे असे विधान त्यांनी केले आहे. मला वाद नव्हे; संवाद आवडतो. मी कोकणी भाषक. कोकणीत लिहितो. मराठी लेखक आणि आपल्यात कधीच भाषावाद आला नाही. कोकणी आणि मराठीत द्वेष नको, वाद नको. पुढचे संमेलन गोव्यात घ्या. सर्व सहकार्य करू. सर्व वाद हे संवादातूनच मिटतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोकणी-मराठी नाते 600 -700 वर्षांचे आहे. संत नामदेव यांनी पंजाबी, उर्दू, कोकणी, मराठी, गुजराती अशा सर्व भाषांत रचना केल्या. इतर भाषांतील शब्द संपदा स्वीकारल्यानेच मराठी समृद्ध झाली आहे. आज मराठी सर्वाधिक संपन्न भाषा असून, इतर बोलींचा आनंद घेता आला पाहिजे असेही ते म्हणाले. 


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज : अशोक चव्हाण


यावेळी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “भाषा-भाषांमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण करून मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध केली पाहिजे. मराठवाडा ही संतांची आणि चळवळीची भूमी आहे. ते अनेक भाषांचे आगर आहे. मराठवाड्यात तेलगु, उर्दू, कन्नड, मराठी भाषा बोलल्या जात असल्या तरीही येथे मराठी भाषेचा दबदबा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून पुस्तकांचे गाव उपक्रम राबविला पाहिजे.”असे अशोक चव्हाण म्हणाले. 


डिजिटल स्वरुपात साहित्य निर्माण व्हावे : शिवराज पाटील चाकूरकर


माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, “साहित्य हे व्यावहारिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा विविध पद्धतीचे असू शकते. इतर भाषेतील ग्रंथ मराठीत यावेत. कुराण, बायबल, उपनिषदे यासारखी अजरामर साहित्य निर्माण व्हावीत. येणारा काळ हा डिजिटल आहे. त्याचा मोठया प्रमाणावर वापर होणार आहे. यासाठी डिजिटल स्वरुपात साहित्य निर्माण व्हावे.” असे शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले. 


उदगीर जिल्हा व्हावा : बसवराज पाटील नागराळकर


संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर प्रास्ताविक करताना म्हणाले की, संस्थेचा हीरक महोत्सव साजरा होतो आहे आणि महामंडळाने संमेलन आयोजनाची जबाबदारी दिली आहे. उदगीर हा सीमा भाग आहे. मराठी, तेलगू, कानडी, हिंदी उर्दू भाषा बोलल्या जातात. या तालुक्याला इतिहास आहे. येथे भुईकोट किल्ला आहे. ही संस्था नावाजलेली आहे. संमेलनात सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. येथे बालकुमार आणि पर्यावरण यावर चर्चा होणार आहे. या परिसरात 300 स्टॉल आणि 7 भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. ग्राम पंचायतीच्या ठिकाणी संमेलन होत आहे, असे प्रथमच होत आहे. उदगीर हा जिल्हा व्हावा अशी मागणी बसवराज पाटील नागराळकर यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या :