'दुसऱ्याच खाऊन बसणाऱ्यांना काय बोलणार'; भुजबळांच्या नाशिकात मनोज जरांगे कडाडले
Manoj Jarange : नाशिकमध्ये पोहचताच जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दुसऱ्याच खाऊन बसणाऱ्यांना काय बोलणार', असे म्हणत त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरवात केली आहे.
नाशिक : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यातील वाद काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. आपल्या प्रत्येक सभेतून मनोज जरांगे भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, आज मनोज जरांगे भुजबळांच्या नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे नाशिकमध्ये पोहचताच जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दुसऱ्याच खाऊन बसणाऱ्यांना काय बोलणार', असे म्हणत त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरवात केली आहे.
नाशिक जिल्ह्यात पोहचलेल्या मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हटले की, "मोठ्या माणसांना आम्ही गरीब लोकं काही बोलत नाही. गरीब मराठ्यांना विरोध करणारे मोठे माणसं, त्यांना आम्ही काय उत्तर देणार आहे. दुसऱ्याचं खाऊन बसले, त्यामुळे त्यांना आम्ही काय बोलणार आहे. आता त्यांना द्यायचे जीवावर आले आहे. आमचा सामान्य गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, पण त्यांना गरजवंतांची गरज नाही. त्यांना त्यांच्या बरोबरीचे लोकं हवे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही, असे जरांगे म्हणाले.
त्र्यंबकेश्वरमधील नोंदी भुजबळांसाठी चपराक
नाशिक आणि अहमदनगर जिल्हा आमच्या दौऱ्यात आधीपासूनच होतं. आमचा हा दौरा नियोजित आहे. फक्त त्यांच्यासाठी हा दौरा केला, असले धंदे मी करत नाही. जे ठरलं ते ठरलं. छगन भुजबळ यांना आम्ही महत्त्व देत नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे. हेच छगन भुजबळ यांना उत्तर आणि चपराक आहे. त्यामुळे, त्र्यंबकेश्वर राजानं एवढा मोठा खजिना देऊन एक प्रकारे मराठा समाजाला आशीर्वाद दिला असल्याचे जरांगे म्हणाले.
राज्यातील सर्वच जुन्या मंदिरात नोंदींचा शोध घ्यावा...
त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. 20 ते 22 खोल्यांमध्ये अनेक जुनी नोंदी असल्याचे कागदपत्र आहे. मी स्वतः ती कागदपत्र बघितली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, त्यांनी तात्काळ मनुष्यबळ पाठवून या नोंदीची दखल घ्यावी. नोंदी सापडत नाही असे आता कुणी सांगू नयेत. तसेच, महाराष्ट्रात जेवढी जुनी मंदिरे आहेत, त्या सर्व ठिकाणी अशा नोंदी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, त्रंबकेश्वर प्रमाणेच इतर मंदिरात देखील नोंदींचा शोध घेण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: