मनोज जरांगेंचे वादळ आता धडकणार पवारांच्या बालेकिल्ल्यात, प्रस्थापित मराठा नेत्यांना धक्के बसण्याची भीती
अजितदादा यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर शरद पवार निष्ठावंतांची मोठी नाराजी आहे. जरांगे यांच्यामागे शरद पवार असल्याचे आरोप होत असताना बारामतीमध्ये काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे .
मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता ते बारामती , इंदापूर आणि अकलूज येथे सभेसाठी जाणार असून यामुळे प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या (Maratha Reservation) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारला जरांगे यांनी दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत असताना हा त्यांचा दोन दिवसाचा दौरा राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या अडचणी वाढवणारा ठरणार आहे . त्यामुळेच भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेल्या प्रस्थापित मराठा नेतृत्वावर जरांगे काय बोलणार याकडेही लक्ष असणार आहे . या दोन दिवसाच्या दौऱ्यात अजितदादा पवार , रामराजे निंबाळकर , मोहिते पाटील , हर्षवर्धन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जरंगे सभा घेत आहेत .
जरांगे यांच्या दौऱ्याची सुरुवात उद्यापासून (20 ऑक्टोबर) शिवनेरी किल्ल्यापासून सुरु होणार आहे. जरांगे पाटील हे सकाळी आठ वाजता शिवनेरी किल्ल्यावर अभिवादन करून 10 वाजता जुन्नर , 11 वाजता राजगुरूनगर , 3 वाजता बारामती , 5 वाजता फलटण आणि रात्री 8 वाजता दहिवडी येथे सभा घेणार आहेत. या दौऱ्यात पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही प्रस्थापित मराठा नेत्यांना या सभांतून मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे काय कानपिचक्या देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात अजितदादा यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर शरद पवार निष्ठावंतांची मोठी नाराजी आहे. जरांगे यांच्यामागे शरद पवार असल्याचे आरोप होत असताना बारामती मध्ये काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे .
जरांगे 21 ऑक्टोबर म्हणजे शनिवारी सकाळी 10 वाजता शिखर शिंगणापूर येथे शंभो महादेवाच्या दर्शनाने दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याची सुरुवात करणार असून तेथून थेट मोहिते पाटील यांच्या अकलूज येथे पोचणार आहेत . अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे त्यांची विराट सभेचे आयोजन केले असून यासाठी माळशिरस तालुक्यातील 110 गावातून हजारोच्या संख्येने मराठा समाज या सभेसाठी येईल असा दावा सकल मराठा मोर्चाचे समन्वयक आणि सभेचे आयोजक धनाजी साखळकर यांनी सांगितले. अकलूज नंतर जरांगे यांची सभा हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथे दुपारी दोन वाजता होणार आहे . यानंतर सायंकाळी पाच वाजता कर्जत आणि रात्री आठ वाजता मांजरसुम्भा येथील सभा करून ते आंतरवाली सराटी येथे आपल्या गावाकडे पोहचणार आहेत . यांनतर तीनच दिवसात जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपत असल्याने आरक्षणाबाबत पुढच्या कार्यक्रमाबाबत जरांगे काय बोलणार यावर सर्वांचे लक्ष आहे .
हे ही वाचा :