Malegaon Sakhar Karkhana : अजित पवारांचा शब्द ठरला खरा, माळेगावनं काढली सोमेश्वरची बगल; राज्यात ऊसाला सर्वोच्च दर देणारा कारखाना
माळेगाव सहकारी साखर कारखाना (Malegaon Sahakari Sakhar Karkhana) हा राज्यात ऊसाला सर्वाधिक दर (sugarcane Price) देणारा कारखाना ठरला आहे.
Malegaon Sahakari Sakhar Karkhana : पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना (Malegaon Sahakari Sakhar Karkhana) हा राज्यात ऊसाला सर्वाधिक दर (sugarcane Price) देणारा कारखाना ठरला आहे. या कारखान्याने 2022-23 मध्ये गाळप झालेल्या ऊसाला 3 हजार 411 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे (Balasaheb Taware) यांनी दिली. माळेगाव कारखाना गतवर्षी गाळप केलेल्या ऊसाला किती दर देणार याकडं शेतकऱ्यांचं (Farmers) लक्ष लागलं होतं. अखेर कारखान्यानं ऊसाला सर्वोच्च दर जाहीर केलाय. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शब्द खरा ठरला आहे. सोमेश्वर कारखान्यापेक्षा माळेगावचा कारखाना अधिक दर देईल असे अजित पवार बारामतीच्या सभेत म्हणाले होते.
माळेगाव कारखान्याने काढली सोमेश्वर कारखान्याची बगल
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने (Someshwar Sahakari Sakhar Karkhana) ऊसाला सर्वाधिक दर देण्याचा निर्णय घेतला होता. सोमेश्वर कारखान्याने कारखान्याने 2022-23 सालात गाळप झालेल्या ऊसाला 3 हजार 350 रुपयांचा दर जाहीर केला होता. गेल्या वर्षीच्या ऊस दराची कोंडी फोडत राज्यात सर्वोच्च दर देणारा सोमेश्वर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला होता. मात्र, त्यानंतर माळेगाव कारखान्यानं सोमेश्वर साखर कारखान्यापेक्षा ऊसाला अधिक दर देण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळं माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यात ऊसाला सर्वोच्च दर देणारा कारखाना ठरला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा साखर कारखाना आहे.
शेतकऱ्यांना मिळणार एफआरपीपेक्षा 561 रुपये अधिकचा दर
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीपेक्षा 561 रुपये अधिकचा दर देणार आहे. तर गेटकेनधारक शेतकऱ्यांना 3 हजार 100 रुपये प्रमाणे अंतिम ऊसाचे बिल आदा केलं जाणार आहे. सध्याला एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात माळेगाव साखर कारखाना राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव यांनी दिली. माळेगाव कारखान्यानं गतवर्षीच्या हंगामात 12 लाख 57 हजार 465 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये सभासदांचा 7 लाख 26 हजार, तर गेटकेनधारकांचा 5 लाख 33 हजार मेट्रीक टन ऊस गाळप केला होता. तसेच 11.81 टक्के रिकव्हरीनुसार 13 लाख 28 हजार 900 क्विंटल साखर निर्मिती केली होती. त्याचबरोबर सहविजनिर्मितीतून देखील कारखान्याला चांगला फायदा झाला होता.
अजित पवारांचा शब्द ठरला खरा
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत बोलताना अझित पवारांनी माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखान्यापेक्षा निश्चितपणे अधिकचा दर देईल, असे सांगितले होते. त्यामुळं माळेगावचा कारखाना नेमका किती दर देणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर अजित पवार यांचा शब्द खरा ठरला आहे. माळेगाव कारखान्यानं 3 हजार 411 रुपयांचा दर दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Someshwar Sakhar Karkhana : सोमेश्वरकडून ऊसाला 3 हजार 350 रुपयांचा दर जाहीर, सर्वाधिक दर देणारा राज्यातील पहिलाच कारखाना