(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Maharashtra Majha Vision | कृषी कायद्याबाबत समिती स्थापन, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार : बाळासाहेब थोरात
#MajhaVision2020 : एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्याबाबत समिती स्थापन झाली असून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.
Majha Maharashtra Majha Vision 2020 : कृषी कायद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत, असं राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते. सोबतच वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद नसल्याचंही ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, "केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यातील दोष आम्ही दाखवत आहोत. हे कायदे नफोखोरांसाठीच बनवले आहेत. या कायद्याविरोधात सहकारी पक्ष आमच्यासोबत आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत."
तर वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद आहे का याविषयी ते म्हणाले की, "वाढीव वीज बिलाबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी नितीन राऊतांनी केलेल्या घोषणेवर भाष्य केलं असावं."
नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली, ती आमची चूक होती, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्याविषयी 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात नितीन राऊत यांना विचारण करण्यात आली. तेव्हा वीज बिल माफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय होता, असं ते म्हणाले. यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनाच याविषयी विचारलं. ते म्हणाले की, "कोरोनाच्या आधीही आमचं व्हिजन 100 युनिटच्या आत असलेल्यांना मदत करण्याबाबतचा विषय होता. कोरोनाच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलात मदत करण्याची आमची चर्चा होती. वीज बिलाबाबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना माहित नव्हतं. त्यामुळेच त्यांनी ते वक्तव्य केलं. काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे की सर्वांसमोर मोकळेपणाने बोलतो."
"एक वर्षाच्या काळात खूप संकट आली, विशेषत: नैसर्गिक संकट आली आणि आम्ही त्याचा सक्षमपणे, समर्थपणे सामना केला. याकाळात शासन, प्रशासनाने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला जाईल तेव्हा निश्चितपणे आमच्या सरकारचं कौतुक होईल," अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य केलं.
सरकारच्या कामकाजावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. त्याविषयी थोरात म्हणाले की, "विरोधी पक्ष म्हणून विरोधक काम करत आहेत. लोकशाहीचा तो भाग आहे. पण सरकारचं कामकाज सुरु झालं तेव्हा कोरोना, चक्रीवादळ, पूर यांसारखी संकटं आली. परिणामी आर्थिक स्रोत थांबले. या प्रशासन म्हणून मोठ्या कठीण काळाला सामोरं जावं लागलं."
मदत देण्यासाठी विरोधक कर्ज काढण्याचा पर्याय सुचवत आहेत. त्यावरही बाळासाहेब थोरात यांनी मत मांडतं. "राज्याने आधीच 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज काढलेलं आहे. ज्याप्रकारे कुटुंबाची काळजी घेतो तसंच राज्याची काळजी घेत आहोत. त्यामुळे कर्जाबाबत काळजीपूर्वक निर्णय घेत आहोत, असंही ते म्हणाले.
पाहा व्हिडीओ : वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद नाही: बाळासाहेब थोरात
दिवसभर दिग्गज नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन फक्त एबीपी माझावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठी व्हिजन काय हे आज दिवसभरात जाणून घेण्याचा एबीपी माझाचा प्रयत्न आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात मांडणार आहेत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.