Majha Maharashtra Majha Vision 2020 : मी स्वत: शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं आहे. पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. शेती, साखर या गोष्टीत त्यांच्याएवढा अभ्यास कुणाचा नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरुन मी पवारांवर ते वक्तव्य केलं. मात्र ते व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, ओव्हरऑल नेत्यांबद्दल होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) बोलत होते.
सर्वे केला तर कळेल सरकार अंतर्विरोधामुळं पडणार
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सत्ता बदलण्याचं भविष्य आम्ही वर्तवत नाही. प्रखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावतोय. पुढेही बजावू. अंतर्विरोधामुळं सरकार पडणार हे सर्वे केला तरी लोकं सांगतील. वीज बिल, शाळा उघडणे, परीक्षा यावरुन अंतर्विरोध समोर आला आहे, असं ते म्हणाले.
वीजबिलाप्रकरणात एकाचही कनेक्शन तोडलं तर आम्ही तोडू देणार नाही. बिल तुम्ही करेक्ट करुन देणार नाहीत आणि कनेक्शन देणार. वीजबिलाच्या प्रकरणात तुमची चूक आहे, तुम्ही माफीबद्दल बोललात आणि आता पलटी मारत आहोत. लोकं कनेक्शन कापू देणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आपला अभ्यास वाढवायला हवा
चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही. मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते, प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धवजींनी या प्रश्नांचा अभ्यास नाही. शरद पवारांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. उद्धवजींना मंत्रालय कुठे आहे हे ही माहित नव्हतं. कामकाज कसं होतं हे माहित नाही. फडणवीस 5 वेळा आमदार, त्याआधी नगरसेवक होते. त्यांना अनुभव होता. मी पहिल्यांदा मंत्री झालो. मी रात्री 3 वाजेपर्यंत अभ्यास केला. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनीही अभ्यास केला. उद्धव ठाकरे यांनीही आपला अभ्यास वाढवायला हवा. मी अनेकदा विरोधी पक्षाचा नेता म्हणून प्रश्न विचारले. त्याचे उत्तर त्यांनी मला अनेकदा दिली नाहीत. सर्वसामान्य माणसाला जाणून घ्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमच्या चौकशा लावायच्या असतील तर खुशाल लावा
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमच्या कुणाच्या चौकशा लावायच्या असतील तर ते खुशाल लावू शकतात. यांना घटनाच मान्य नाही असं दिसतंय. सुप्रीम कोर्टाचाही निर्णय यांना मान्य नसतो. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तो चांगला आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय दिला तर तो चुकीचा, असं कसं चालेल, असंही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ईडी वाढीव संपत्ती आणि मनी लॉड्रिंगची चौकशी करते. आमच्या कुणाचं काही असेल तर तसं तुम्ही माध्यमात कागदपत्रं द्या. तुम्हाला तुमची माणसं टिकवता येत नाहीत, हे मान्य करावं, असं ते म्हणाले.
.. तर सुप्रिया सुळेच मुख्यमंत्री होतील
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांना राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आली तर सुप्रिया सुळेंनाच करतील, असं माझं विश्लेषण आहे. ते चुकीचंही नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावं वाटणं हे चूक नाही, असंही ते म्हणाले. यावेळी 80 तासाच्या सरकारआधी बैठकीत काय घडलं होतं यावर बोलणं चंद्रकांत पाटील यांनी टाळलं. प्रियम गांधी यांच्या पुस्तकाबद्दल ऐकूण आहे, ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे, असं ते म्हणाले.
शिवसेनेसोबत आता जाणार नाही
शिवसेनेसोबत आता जाणार नाहीत. शिवसेनेबद्दल कटूता नाही. पण आता आम्हाला आमची ताकद पाहायची आहे. आम्हाला राष्ट्रवादीही नको आणि शिवसेनाही नको, आम्हाला आमची ताकत पाहायचीय. आमचं संघटन मजबूत झालं आहे, हे माझं मत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तरीही याबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर तो केंद्रीय नेतृत्व घेईल.
ट्रोलिंगबद्दल आचारसंहिता ठरवावी लागेल
ट्रोलिंगबद्दल बोलताना ते म्हणाले की, सगळ्या पक्षाच्या लोकांनी एका बंद खोलीत बसावं. काय समस्या आहेत, राजकीय, सामाजिक संस्कृती का बदलली यावर विचार व्हावा. राज्य सरकारमधील महत्वाचे लोक चंपा म्हणण्याचं समर्थन करतात हे वाईट आहे. आम्ही म्हणणार नाही पण उद्धव ठाकरेंना उठा, शरद पवारांना शपा म्हटलं तर चालेल का? अशा ट्रोलिंगबद्दल आचारसंहिता ठरवावी लागेल, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या
वीजबिल माफीचं काय? 'राज्याचे पैसे केंद्रानं अडवले!', आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने