... आणि यामुळेच रावसाहेब दानवेंचं प्रदेशाध्यक्ष गेलं; खैरेंनी सांगितला किस्सा
लोकसभा निवडणुकीनंतर रावसाहेब दानवे यांचे प्रदेशाध्यक्ष पद का काढण्यात आले यावर खैरेंनी नवाच दावा केला आहे.
Chandrakant Khaire On Raosaheb Danve: शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही नवीन नाही. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. त्यात आता खैरे यांनी दानवे यांचं प्रदेशाध्यक्ष पद जाण्याचे कारण सांगितले आहे. जालना दौऱ्यावर असलेल्या खैरेंनी माध्यमांशी बोलताना हा किस्सा सांगितला, तर याचवेळी दानवेंवर जोरदार टीका सुद्धा केली.
यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, मला रावसाहेब दानवेंनी धोका दिला. रुग्णलयात बसून, युतीचे नेते असताना युतीच्या विरोधात काम केलं. त्यांनतर एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आल्याने दिल्लीत त्यांचं पद काढून घेण्यात आले. आता पुन्हा हात-पाय पडून राज्यमंत्री झाले असल्याचा आरोप खैरे यांनी केला. दानवे फक्त चकवा मारतात बाकी काहीच करत नाही असेही खैरे म्हणाले.
लोकसभेत भाजपने पैसे पुरवले...
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला.
दरेकरांचं खैरेंना सडेतोड उत्तर
खैरेंनी केलेल्या आरोपाला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहेत. असे बिनबुडाचे आरोप संजय राऊत यांच्यानंतर खैरे करायला लागले आहेत. अशाप्रकारे बेताल आरोप केल्याने प्रसारमाध्यमात 'पब्लिसिटी' मिळते असा खैरेंचा समज आहे. मला वाटते हजार कोटी दिले असतील तर पटवून द्यावे. तसेच त्यांच्या पक्षप्रमुखांनी सांगावे हजार कोटी कुणी कुठे आणि कसे दिले. शेवटी आता त्यांच्या पक्षाच्या विश्वासर्हतेचा प्रश्न आहे, असंही दरेकर म्हणाले.