मुंबई : राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोकणासह, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain News) झाला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे. वाशिमच्या मालेगाव, रिसोड तालुक्यांमध्ये आज दुपारी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुसळधार पडलेल्या पावसाच्या भागात जवळपास 50 टक्के खरीप पेरणी आटोपली होती. त्यामुळे आजचा पडलेला पाऊस शेतीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
सांगलीत ढगफुटी सदृश्य पाऊस
सांगली जिल्ह्यातही पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. आंबेबनमळा येथे झाडाला बांधलेली जनावरे पाण्यात बुडू लागली असताना शेतकऱ्यांने वेळीच धाव घेत जनावरांची सुटका केली. शेतकरी राजू चपणे यांनी कमरेइतक्या पाण्यात जात जनावरे सोडवून पाण्याच्या बाहेर काढत जनावरांचा जीव वाचवला.
जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ईटकुर गावात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी दिलीप गंभीरे यांच्या शेतातील बंद असलेल्या बोअरवेलमधून उडाले पाण्याचे उंच फवारे उडाले. धाराशिव, कळंब आणि वाशी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. तर धाराशिव तालुक्यातील सारोळा येथील बंधारा आणि नदी-नालेही तुडुंब भरले. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
वसई-विरारमध्ये दुपारनंतर पावसाची हजेरी
वसई, विरार, नालासोपारा परिसरात दुपारनंतर पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अधून-मधून जोरदार तर कधी रिमझिम पाऊस पडत आहे. हवेत गारवा निर्माण झाला असून,उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे. परिसरात ढग दाटून आले आहेत तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या होणाऱ्या पाऊसामुळे शहरातील नागरिकन सह ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे.
भिवंडीत काही तासांचा पावसात भाजी मार्केटमध्ये साचले पाणी
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे दुपारनंतर भिवंडी शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. भिवंडी शहरातील सखल भागात पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाले असून शहरातील मुख्य बाजारपेठ आणि भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती तर ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक गावात वीज पुरवठा खंडित करण्यात आली होती.