पुणे : पंतप्रधान कार्यालयात (PMO Office) राष्ट्रीय सल्लागार (National Advisor) असल्याचे सांगून तब्बल 50 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime News) घडला आहे. शासनाचे टेंडर (Government Tenders) मिळवून देतो असे म्हणत फसवणूक करण्यात आली असून आरोपी आणि फिर्यादी यांची थेट पुण्यातील विधान भवनात भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींची कुठल्यातरी कारणावरून ओळख झाली होती. यानंतर आरोपी कश्मीरा पवार यांनी फिर्यादींना त्या स्वतः पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. शासकीय टेंडर मिळवून देतो अशी बतावणी सुद्धा कश्मीराने केली.


टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली उकळले तब्बल 50 लाख


विश्वास संपादित व्हावा म्हणून आरोपींनी फिर्यादीला थेट पुण्यातील विधान भवनात भेटण्यासाठी बोलावलं व त्यांच्या व्हॉट्सॲपवर शासकीय टेंडरचे बनावट कागदपत्र सुद्धा पाठवले. टेंडर मिळवल्यानंतर पैसे कमवता येतील या भावनेतून फिर्यादीला विश्वास बसला. टेंडर मिळवायचे असेल तर पैसे भरावे लागतील, असे सांगून आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून रोख स्वरूपात तसेच आरटीजीएसद्वारे 50 लाख रुपये उकळले. 


फसवणुकीचा गुन्हा दाखल


एवढी मोठी रक्कम देऊन सुद्धा टेंडर मिळत नाही आणि आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादीने बंडगार्डन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


पुण्यातील गुटखा रॅकेट चालवणाऱ्या मास्टरमाईंडला बेड्या 


दरम्यान, पुण्यातील गुटखा रॅकेट चालवणाऱ्या मास्टरमाईंडला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. निलेश ललवाणी असे या गुटखा रॅकेट चालवणाऱ्या मास्टरमाईंडचे नाव आहे. हडपसर भागातून ललवाणी याला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नऱ्हे भागातून 1 कोटी 63 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी चार जणांना याआधी अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील निलेश ललवाणी हा मुख्य आरोपी  फरार होता. अखेर त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 


आणखी वाचा 


आईस्क्रीममध्ये गोम सापडली! अमूल कंपनीने घेतली दखल; तपासणीसाठी महिलेकडून Ice Cream चा डबा परत मागवला