Maharashtra Weather : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजपासून (15 मार्च) राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे. अशातच आता पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.


तापमानात घट होण्याची शक्यता


हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दुपारी कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. तर कुठे ढगाळ वातावरण तयार झालं आहे. याचा शेती पिकांना फटका बसत आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही दोन अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता घेऊन हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.  






16 ते 18 या भागात पावसाचा अंदाज


गुरुवार दिनांक 16 मार्च ते 18 मार्चपर्यंत तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. विशेषतः पावसाच्या तीव्रतेची निश्चिती मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


विदर्भ 


16 आणि 17 मार्चला तीन दिवस विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे.  


मराठवाडा


मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. 16 मार्चपर्यंत मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे.


उत्तर महाराष्ट्र


उत्तर महाराष्ट्रातही 16 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता अधिक जाणवत आहे.  


पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज 


पश्चिम महाराष्ट्रातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यलो अलर्टमध्ये हवामान खात्याने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तात्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असा या अलर्टचा अर्थ आहे.


शेतकरी चिंतेत


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण सध्या शेतीपिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आला तर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्ष बागांची देखील काढणी सुरु आहे. अशातच पाऊस किंवा गारपीट झाल्यास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Heat Wave : आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज, पिकांच्या सुरक्षेबाबत कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन