15th March In History : देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. मुघल सम्राट अकबर याने हिंदूवरील जिझिया कर रद्द केला. तर, आजच्या दिवशी जगातील पहिला अधिकृत कसोटी सामना आजच्या दिवशी खेळवण्यात आला. कॉलरा, प्लेगवर लस शोधणारे संशोधक डॉ. हाफकीन यांचा आज जन्म दिवस आहे. 


जागतिक ग्राहक हक्क दिन World Consumer Rights Day


15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Rights Day) म्हणून साजरा केला जातो. 15 मार्च 1962 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे केलेल्या भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व चार हक्क प्रदान केले. त्यानंतरच्या कालावधीत ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा करून मुलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी चार ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. 


इसवी सन 44 : रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या 


रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या केली. रोमन प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रूपांतर होण्यात ज्युलियस सीझरचा मोठा वाटा होता.


1564: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.


मुघल सम्राट अकबर याने हिंदूवरील जिझिया कर रद्द केला. मुघल काळात गैर इस्लामी नागरिकांना धार्मिक स्थळी पर्यटनासाठी जाताना मुघल सरकारला कर द्यावा लागत असे. या करामुळे मुघल साम्राज्याची तिजोरी भरत होती. त्यातून सैन्य आणि प्रशासनाचा खर्च भागवला जात असे. अकबराकडे मुघल साम्राज्याची सूत्रे आल्यानंतर जनतेत असणाऱ्या असंतोषाची दखल घेत जिझिया कर रद्द केला.


1680: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह


छत्रपती राजाराम यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला. छत्रपती राजारामच यांचा विवाह स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी जानकीबाईंशी 15 मार्च 1680 रोजी झाले. 


1831 :  मराठीतील पहिल्या छापील पंचांग विक्रीस सुरुवात


मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस आणले. गणपत कृष्णाजी यांनी आणलेल्या छापील पंचागास सुरुवातीला समाजाने पाठ फिरवली होती. कर्मठ व्यक्तींनी त्याला विरोध केला होता. मात्र, हळूहळू त्यांचा विरोध कमी होऊ लागला. पहिल्या छापील पंचांगाची किंमत ही 50 पैसे इतकी होती. 


1877 : जगातील पहिला अधिकृत कसोटी सामना


1877 मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा पहिला अधिकृत कसोटी क्रिकेट सामना झाला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात दोन कसोटी सामने झाले. त्यानंतर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. 



1860: डॉ. हाफकीन यांचा जन्म 


प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म झाला. प्लेगवर लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्म जंतुशास्त्रज्ञ म्हणून डॉ.वाल्देमार हाफकीन यांना ओळखले जाते. पॅरिसमधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलराविरोधी लस विकसित करून तिचे भारतात यशस्वीरित्या परीक्षण केले. मुंबईत परळ येथील सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधन करणार्‍या आणि विविध लसींचे उत्पादन करणार्‍या संस्थेला हाफकीन इन्स्टिट्यूट असे नाव दिले आहे.


1934 : काशीराम यांचा जन्म


देशातील बहुजन समाजाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे काशीराम यांचा जन्म. काशीराम यांनी बामसेफ (बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन) या संघटनेची स्थापना केली. पुढे त्यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. सायकलवरून प्रवास करत त्यांनी संघटना-पक्षाचा प्रचार केला होता. उत्तर प्रदेशात त्यांनी बसपाची सत्ता आणली. देशाच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. 



1937 : अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन


व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट होते. अभिनयासह ते गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. 



1992: हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन


महाभारत या गाजलेल्या टीव्ही मालिकेचे पटकथाकार डॉ. राही मासूम रझा यांचा आज स्मृतीदिन. डॉ. राही मासूम रझा यांचे उच्च शिक्षण अलीगड मुस्लिम विद्यापीठात झाले.  आधा गाँव, दिल एक सादा काग़ज़, ओस की बूंद, हिम्मत जौनपुरी आदी कादंबऱ्यांचे लेखन केले. अलीगडमध्ये असताना ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. भूमीहिन आणि कष्टकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 1968 मध्ये ते मुंबईत दाखल झाले. चित्रपटसृष्टीत ते कार्यरत होते. जवळपास 300 चित्रपटांच्या कथा-पटकथांचे त्यांनी लेखन केले. महाभारत आमि नीम का पेड या गाजलेल्या मालिकांचे लेखन त्यांनी केले.