Maharashtra Weather Update Today : राज्यात थंडी फारशी नाही, पण पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता (maharashtra weather) वर्तवण्यात आली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने (Cold Weather in Maharashtra) हजेरी लावली. रिमझिम पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आहे. तर पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
मुंबईत पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान असेल. कुलाबा केंद्रात 27.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. धुक्याची चादरही पसरलेली पाहायला मिळत आहे. तर मुंबईत पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे दोन दिवस पावसाचा अंदाज आहे, तर रायगडमध्ये रविवारी हलका पाऊस पडू शकतो. उत्तर मध्य भारतात धुळे, नंदुरबार येथेही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो.
ऐन थंडीत सांगलीत पावसाची हजेरी; पावसामुळे हवेत गारठा वाढला
सांगली शहरात रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडाली. ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे. रात्री अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पावसाचे थेंब पडले. अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. या पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
वसईत थंडीचा कडाका, तापमान 20 अंशावर -
वसई : राज्यात थंडीची चाहूल सुरु झाली आहे . रात्रीच्या आणि सकाळच्या वेळी रस्यावर धुक्यांची चादर पसरसेली दिसून येते. मुंबई शहरासह उपनगरातही तापमान घसरले आहे. ही दृश्य मुंबई लगतच्या वसई येथील सनसिटी परिसरातील आहे.धुक्यांची चादर रस्त्यावर पसरली आहे. मुंबईच्या लगत असलेल्या वसई विरार मध्ये 20 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता शहरात हुडहुडी वाढणार असून,नागरीकांना थंडीचा आनंद लुटता येणार आहे.