मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 5 जानेवारी 1971 रोजी किक्रेट विश्वाच्या इतिहासातला पहिला क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे पेशवे यांनी 5 जानेवारी 1671 रोजी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्ला जिंकून घेतला. 1982 मध्ये सी रामचंद्र यांचे निधन झाले होते. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या घडामोडी घडल्या हे सविस्तर जाणून घेऊयात.
1671 : शिवरायांनी साल्हेरचा किल्ला जिंकून घेतला
छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे पेशवे यांनी 5 जानेवारी 1671 रोजी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्ला जिंकून घेतला. साल्हेरवर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराठ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच हा ठार झाला. दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार साल्हेर वाचवण्यासाठी फर्रादपूराहून निघाला, पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली.
1934: भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा जन्मदिन (murli manohar joshi)
मुरली मनोहर जोशी यांचा आज जन्मदिन आहे. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1934 रोजी दिल्लीत झाला. 1991 ते 1993 या काळात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये त्यांची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. मुरली मनोहर जोशी यांना 'पद्मविभूषण' सन्मानही मिळाला आहे.
1941: मन्सूर अली खान पतौडी यांची जयंती (5 जानेवारी 1941 - 22 सप्टेंबर 2011) (mansur ali pataudi)
मन्सूर अली खान पतौडी यांची आज जयंती असून ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान खेळाडू होते. त्यांनी भारतासाठी 46 कसोटी सामने खेळले असून 40 सामन्यांमध्ये ते भारतीय संघाचे कर्णधार होते. यासोबतच ते प्रसिद्ध अभिनेता सेफ अली खान यांचे वडील देखील आहेत.
1943 : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्रावीण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.
1955: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जन्मदिन (mamata banerjee birthday)
आज ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस आहे. राजकीय क्षेत्रात 'दीदी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी झाला. बंगालची राजधानी कोलकाता येथील ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ममता यांनी वयाच्या 15 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. ममता या 17 वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांचे वडील प्रोमिलेश्वर बॅनर्जी यांचे निधन झाले. 1984 साली कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा यांचा प्रभाव करून ममता बॅनर्जी या खासदार म्हणून निवडणून आल्या. ममता बॅनर्जी या सलग तीन वेळा बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत.
1971 : वनडे क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना खेळवला गेला
वनडे क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 5 जानेवारी 1971 रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याचे पहिले तीन दिवस पावसामुळे वाया गेल्याने सामनाधिकाऱ्यांनी सामना संपवण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रती षटक आठ चेंडू यानुसार 40-40 षटकांचा एकदिवसीय सामना खेळवण्याचं निश्चित करण्यात आलं. सध्या एकदिवसीय सामने 50-50 षटकांचे असले तरी पहिला एकदिवसीय सामना 40-40 षटकांचा होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तर 82 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जॉन एडरिचने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिला सामनावीर बनण्याचा मान मिळवला. त्यांना 90 पौंडचं बक्षीस मिळालं होतं. तब्बल 46 हजार प्रेक्षक या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनले होते.
1982 : सी रामचंद्र यांचे निधन
रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र चित्रपटनिर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले.सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य व पं. विनायकबुवा पटवर्धनांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा एकलव्यासारखा अभ्यास केला होता. रामचंद्र चितळकरांना खरे तर नट व्हायचे होते. अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने सहकलाकार म्हणून स्थिरावले. तेही काम मिळेनासे झाल्यावर ते थेट चित्रपट निर्माते सोहराब मोदींना भेटले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दाखवली, तेव्हा मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले. 5 जानेवारी 1982 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.
2004: संभाजी ब्रिगेडकडून भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटवर हल्ला
आजच्याच दिवशी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला संभाजी ब्रिगेडकरुन करण्यात आला. जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील जिजाबाई यांच्या तथाकथित बदनामीचा संशय घेऊन संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. 2017 साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांवर आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या घडामोडी
1913: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म.
1952: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म
1933: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
1986: हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.