Lok Sabha Election 2024 :  आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही महिनेच राहिले असताना राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही आघाडी, युतीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आज मुंबईत शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी जागा वाटपावर चर्चा केल्याची माहिती आहे. 


महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरलं?


शिवसेना ठाकरे गटाने दिलेल्या निमंत्रणानुसार आज शिवसेना नेते सुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडी शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली. यामध्ये शिवसेना ठाकरे गट,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या तीन पक्षांमधील जागावाटप अंतिम निर्णय झाला नसल्याचं शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सांगण्यात आले. 


मागील काही दिवसांपासून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात जागा वाटप ठरलं असल्याचे वृत्त समोर आले होते. तिन्ही पक्षांमध्ये दावे-प्रतिदावेही सुरू झाले होते. मात्र, आज, ठाकरे गट आणि वंचितमध्ये झालेल्या बैठकीनुसार महाविकास आघाडीत जागा वाटप झाले नसल्याची माहिती आहे. 


वंचितला किती जागा मिळणार?


महाविकास आघाडीत जागा वाटप झाले नसल्याची बाब समोर आल्यानंतर वंचितने आपली भूमिका सुभाष देसाई यांच्यासमोर मांडली. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षात जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतरच शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी जागा वाटप संदर्भात ठरवेल अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळाने मांडली. लवकरच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक होऊन या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. 


उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले होते?


काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचितसोबतच्या आघाडीबाबत माहिती दिली. ठाकरे यांनी म्हटले की, वंचित बहुजन आघाडीशी आमची बोलणी सुरू आहे. दोन दिवसांमध्ये संजय राऊत यांच्यासमवेत शिवसेनेचे 2 नेते आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील. याशिवाय, शिवसेना, राष्ट्रवादी वंचित अशा महाविकास आघाडीतील पक्षांशी एकत्रित बैठक घेतली जाईल. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करु. 12-12 जागांचा कोणताही फॉर्म्युला अद्याप माझ्यासमोर आलेला नाही," असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.