Twin Sister Marriage: सोलापूरच्या (Solapur) अकलूजमधील तरुणानं मुंबईतील जुळ्या बहिणींशी केलेलं लग्न आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण द्विभार्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या लग्न सोहळ्यावर कारवाईची होऊ शकते. भारतीय दंड संहिता 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे लग्न कायदेशीर ठरु शकते का? तसेच या प्रकरणात कोणावर कारवाई होऊ शकते? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. जाणून घेऊयात वकिलांनी या लग्नाबाबत दिलेली माहिती..
हे लग्न कायदेशीर ठरु शकत नाही: अॅड महेश भोसले
अॅड. महेश भोसले यांनी एबीपी माझाला माहिती देताना सांगितलं, 'हे लग्न कायदेशीर ठरु शकत नाही. जुळ्या बहिणींनी स्वत:च्या मर्जीनं त्या तरुणासोबत लग्न केलं असेल तरी देखील हे लग्न कायदेशीर ठरत नाही. याचं विवाह प्रमाणपत्र (Marriage certificate) देखील होऊ शकत नाही. या प्रकरणात पहिली पत्नी कोणती? या प्रश्नाचं उत्तर मिळू शकत नाही. पहिली पत्नी कोण?, हे जर ठरलं तर त्यानुसार सगळे अधिकार त्या तरुणाच्या पहिल्या पत्नीला मिळतील. तसेच दुसऱ्या पत्नीच्या वारसाला संपत्तीचा वाटा मिळू शकतो. '
महिला आयोगाची तक्रार हास्यास्पद
'जर त्या तरुणाच्या पत्नीनं तक्रार केली तरच त्या तरुणावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. महिला आयोगानं यावर कारवाईची मागणी करणं, हे हास्यास्पद. मी जर वकील म्हणून यावर बाजू मांडली तर अशी असेल की, ज्या व्यक्तीचा या प्रकरणासोबत संबंध आहे तोच व्यक्ती तक्रार करु शकतो. महिलेचा कोणी अपमान केला किंवा महिलेवर काही अन्याय झाला तरच महिला आयोग तक्रार करु शकते.' असंही अॅड. महेश भोसले यांनी सांगितलं.
वकील संतोष आग्रे यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, 'हिंदू कायद्यानुसार, हे लग्न कायदेशीर मानलं जाऊ शकत नाही. त्यांच्या लग्नाची वेळ, मुहुर्त या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या प्रकरणावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. विवाह कायद्याच्या शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे हे लग्नच बेकायदेशीर आहे.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: