Bigamous Marriages Act: गेल्या काही दिवसांपासून सोलापूरचा (Solapur) तरुण आणि जुळ्या बहिणी यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. सोलापूरच्या अतुल नावाच्या तरुणानं कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींसोबत विवाह केला. त्यानंतर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. जुळ्या बहिणींसोबत लग्न करणं अतुलला महागात पडलं आहे. या विवाहाची महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबतची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली. तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलिस ठाण्यात या विवाहाच्या विरोधात NCR दाखल झाला आहे. पत्नी किंवा पत्नीच्या हयातीत लग्न करणाऱ्यांना शिक्षा होते का? तसेच हिंदू विवाहित पुरुष हा दुसरं लग्न करु शकतो का?

  असे प्रश्न अनेकांना पडले असतील. त्याबाबत जाणून घेऊयात...


द्विभार्या प्रतिबंधक कायदा


द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजे Bombay prevention of hindu bigamous marriages act 1946. हा एक स्वतंत्र कायदा आहे. या कायद्याअंतर्गत  हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीपासून विभक्त न होता दुसरं लग्न करू शकत नाही. जरी हिंदू पुरुषानं पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न केलं तर त्याच्या दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळत नाही. 


काय आहे भारतीय दंड संहितेचा कलम 494? 


भारतीय दंड संहितेच्या कलम 494 नुसार, पती किंवा पत्नीच्या हयातीत पुनर्विवाह करणे हा दंडनीय गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेच्या या कलमात अशा गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. काही धर्मांच्या कायद्यात असे करणे गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही, त्यामुळे हे कलम त्या धर्माच्या लोकांना लागू होत नाही. हा जामीनपात्र, अदखलपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात कारावासाच्या शिक्षेबरोबरच आर्थिक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार, एखादी महिला तिच्या पतींनं दुसरे लग्न केले तर त्या विरोधात तक्रार दाखल करु शकतात. 


शिक्षा आणि दंड


भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अन्वये एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास, अशा व्यक्तीला न्यायालयाने जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. दोषीला ठोठावण्यात येणारा दंड हा कोर्ट ठरवतो.


कोण करु शकतं तक्रार? 


द्विभार्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पहिलं लग्न लपवलं म्हणून महिला तक्रार करु शकते. तसेच पहिलं लग्न झालेली महिला देखील तक्रार करु शकते. 


दुसरं लग्न करण्यासाठी नियम काय? 


पहिलं लग्न झालेल्या व्यक्तीला जर दुसरं लग्न करायचे असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला पहिल्या पती/पतीला 1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट घेणे अनिवार्य आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


उच्चशिक्षित जुळ्या बहिणींचं एकाच मुलाशी लग्न, अकलूजमध्ये धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा


Solapur News : एकाच मांडवात दोघींशी विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट, अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल