Beed News Update : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजाच्या संघटनांनी ठिय्या आंदोलन केले आहे. घरकुलची जागा नावावर करून मिळत नसल्याने सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आप्पाराव पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करून ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या शासन प्रशासनातील व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  


बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलच्या जागेसाठी उपोषण करणाऱ्या आप्पाराव पवार यांचा काल आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर 302 चे गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पारधी समाजाच्या संघटनांनी ठिय्या मांडला आहे.


बीडच्या वासरवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या पवार कुटुंबीयांना शबरी घरकुल योजनेत घरकुल मिळालं. मात्र, जागा नावावर करून मिळत नसल्याने ते उपोषणाला बसले होते. परंतु, यातील कुटुंबप्रमुख असलेले आप्पाराव पवार यांचा आंदोलनादरम्यान काल पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मृत्यू झाला होता. याप्रकरणी पवार कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र त्यापूर्वी आप्पाराव पवार यांच्या मृत्यूला कारण ठरलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पारधी संघटनांनी केली आहे.  


दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबतची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. "घरकुलाच्या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपोषणाची वेळीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळेच त्यांना प्राण गमावावे लागले. ही अतिशय गंभीर घटना आहे. हक्काचे घर मागणाऱ्या गरीब व्यक्तीला शासनाच्या दाराशी प्राण गमावावे लागतात ही बाब प्रचंड संतापजनक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी नम्र विनंती आहे की, कृपया या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या शासन प्रशासनातील व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.  






महत्वाच्या बातम्या


धक्कादायक! घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने उपोषणाला बसलेल्या व्यक्तीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच दुर्दैवी मृत्यू