(Source: ECI/ABP News/ABP Majha)
School : शाळांबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी; मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि 'या' नियमांचं पालन करावं लागणार
School Reopen : राज्यातील शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या शाळेतील विद्यार्थ्यांना पालन करणं बंधनकारक आहे.
मुंबई : आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या शाळा सुरु करण्याबाबतच्या शासन निर्णय व त्यातील मार्गदर्शक सूचनांची आता प्रतीक्षा आहे. येत्या 1 डिसेंबर पासून राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हापरिषद, महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन राज्यातील सर्व शाळांनी करायचा आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या या सूचनांचा विचार शिक्षण विभाग करणार आहे. त्यानंतर याबाबतीत शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे.
काय आहेत आरोग्य विभागाच्या सूचना?
- दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो किमान सहा फूट अंतर ठेवावे.
- शाळेमध्ये प्रत्येका विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.
- वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी.
- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
- शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितीच्या पद्धतीचा अवलंब करू नये.
- शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.
- ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी.
- मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये,आवश्यक नियमांचे पालन करावे.
- क्वॉरंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी
राज्यातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एक डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. जवळपास दोन वर्षानंतर शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. पाल्यांना मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसणार आहे.
संबंधित बातम्या :
- Maharashtra School Reopen News : शाळा पुन्हा गजबजणार! एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार
- Omicron variant : ओमिक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार का? राजेश टोपेंचं महत्वाचं वक्तव्य
- School Reopen Guidelines : शाळा सुरु होताहेत... 'या' असतील मार्गदर्शक सूचना, टास्क फोर्सच्या सदस्यांशी खास संवाद