Omicron in India : देशात ओमायक्रॉनचे (Omicron Variant) रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार, भारतात ओमायक्रॉन संसर्गाची एकूण 1,700 प्रकरणे आढळून आली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 510 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर दिल्लीमध्ये 351 रुग्ण आढळले आहेत. तर केरळात 156, गुजरातमध्ये 136, तामिळनाडूत 121 आणि राजस्थानमध्ये 120 रुग्ण आढळले आहेत.


राज्यातील आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सोमवारी ओमायक्रॉनचे 68 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये 40, पुण्यामध्ये 14, नागपूरमध्ये 4, पुणे ग्रामीण आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 3, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. 


दिल्लीमध्येही गेल्या 15 दिवसांत दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांत आढळलेल्या रुग्णांमध्ये 84 टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण असल्याचं निष्पन्न झालं. ओमाक्रॉनचं वाढतं संकट पाहता दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) आज बैठक बोलावली आहे. DDMA ने 29 डिसेंबर रोजी आपल्या शेवटच्या बैठकीत दिल्लीत 'यलो अलर्ट' अंतर्गत लादलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.


देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यानंतर आता कोविड-19 ची तिसरी लाट देशात दाखल झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 37 हजार 379 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 124 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर, देशात कोविड-19 चे एकूण रुग्णांची संख्या 3 कोटी 49 लाख 60 हजार 261 वर पोहोचली आहे. तर, या महामारीमुळे प्राण गमावलेल्या लोकांची संख्या 4 लाख 82 हजार 14 वर पोहोचली आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha