Mumbai Cyber Crime : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं एका 21 वर्षीय तरुणाला 'बुली बाई' अॅप्लिकेशन प्रकरणात बंगळुरुमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांचं एक विशेष पथक त्याला बंगळुरुही मुंबईला घेऊन येत आहे. त्यानंतर या तरुणांची चौकशी केली जाईल. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला मिळालेल्या तक्रारीनंतर सायबर सेल या प्रकरणात चौकशी करत होतं. एफआयआरनुसार, बुली बाई एक असं अॅप्लिकेशन आहे, जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती.


या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या अॅप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं अज्ञात लोकांविरुद्ध आयपीसी कलम 354D, 509, 500, 153A, 295A, 153B, IT च्या कलम 67 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरु केला होता.


100 मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड 


पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुली बाई' अॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटोही अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही (auction) लावली जात होती. या प्रकरणात आज आरोपीला अटक होऊ शकते, तसेच त्याला कोर्टात हजर केलं जाऊ शकतं. 


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलनं ट्विटरवर लिहिलं होतं. कारण 'बुली बाई'शी संबंधित 3 ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. या अॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतरच मुंबई पोलिसांनी बुली बाय अॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते. 


मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते आता त्या सर्व महिलांना त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी बोलावत आहेत, जेणेकरून हे प्रकरण अधिकाधिक मजबूत व्हावे, त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करण्याचे कामही मुंबई पोलिसांकडून केलं जात आहे, जेणेकरून या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांबद्दल शोधता येईल.