NCP : समीर भुजबळांना संधी द्यावी यासाठी भुजबळांचा दबाव, तर पार्थ पवारांचंही नाव चर्चेत; राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार ठरेना
Rajya Sabha Election : एकीकडे ओबीसी समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मागणी असताना दुसरीकडे पार्थ पवारांनीही कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केल्याची चर्चा आहे.
मुंबई: राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी (Rajya Sabha Election) आता दोन दिवस बाकी आहेत, मात्र अजुनही राष्ट्रवादी काँग्रेसचा (Ajit Pawar) राज्यसभेचा उमेदवार कोण असेल हे स्पष्ट झालेलं नाही. सध्या अजित पवार यांना वेगवेगळी शिष्टमंडळे भेटायला येऊन जात असून आपआपल्या नेत्यासाठी राज्यसभेची उमेदवारी मागत आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार कोण असेल हे निश्चित झालेलं नाही. सध्या पक्षात ओबीसी समाजाला संधी द्यावी अशी मागणी करणारा एक ग्रुप आहे तर दुसरा ग्रुप अल्पसंख्यांक चेहऱ्याला संधी देण्याची मागणी करत आहे.
समीर भुजबळांना संधी द्यावी यासाठी छगन भुजबळांचा दबाव
राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आपले पुतणे समीर भुजबळ यांना संधी द्यावी यासाठी वरिष्ठांवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. राज्यातील ओबीसी समाजात सरकारबाबत असलेला रोष पाहता तो शांत करण्यासाठी ओबीसी प्रतिनिधी दिल्यास फायदा होईल अशी भुजबळांची भुमिका आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या वतीने देखील आपल्या समूदायाला संधी मिळावी अशी भूमिका आहे. नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले बाबा सिद्धकी, माजी मंत्री नवाब मलिक यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. नवाब मलिकांनी नुकतंच राष्ट्रवादीतील सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. यासोबतच अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी हे देखील इच्छुक आहेत.
पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा
सध्या पक्षात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना संधी मिळावी असा देखील एक मतप्रवाह आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पार्थ पवार यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास सर्व पदे एकाच कुटुंबात अशी चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडं सुनील तटकरे यांना संधी दिल्यास त्यांना पक्षाचं काम करता येईल असा ही एक मतप्रवाह आहे.
कर्जत येते पार पडलेल्या बैठकीत अजित पवार यांनी लोकसभेसाठी 4 जागांवर दावा सांगितला होता. यामध्ये सुनील तटकरे रायगडची जागा लढवतील असंही स्पष्टं केलं होतं. जर सुनिल तटकरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर रायगडच्या जागेवरील दावा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत निर्णय झालेला नाही. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अद्याप राज्यसभेच्या जागेबाबत निर्णय झाला नसून पुढील 2 दिवसांत निर्णय होणार आहे.