LIVE UPDATES | वैनगंगा नदीत उडी मारलेल्या प्रेमी युगुलाचे मृतदेह शोधण्यात अखेर प्रशासनाला यश
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमधील 35 तास उलटूनही धुमसतीच, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु लॉकडाऊनमध्ये तरुणांसाठी संधी! 'महापारेषण'मध्ये होणार 8500 पदांवर भरती कुणी ED लावली, तर मी CD लावीन.. राष्ट्रवादीत प्रवेश करतेवेळी एकनाथ खडसे यांची फटकेबाजी मुंबई इंडियन्सकडून चेन्नईचा 10 विकेट्सनी धुव्वा; डीकॉक-किशनची अभेद्य सलामी, सातव्या विजयासह मुंबई गुणतालिकेत टॉपवर दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
25 Oct 2020 10:15 PM
काही वेळातचं शिवसेनेच्या ऑनलाईन दसरा मेळाव्याला सुरुवात होणार
वैनगंगा नदीत उडी मारलेल्या प्रेमी युगुलाचे मृतदेह शोधण्यात अखेर प्रशासनाला यश आलंय. चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्याची सीमा असलेल्या वैनगंगा नदीच्या कठड्यावरुन एका प्रेमीयुगुलाने शुक्रवारी उडी घेतली होती. त्यांची ओळख गडचिरोली येथील प्रतीक गिरडकर व त्याची अल्पवयीन मैत्रीण अशी पटली होती. वैनगंगा नदीत बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू होते. दरम्यान काल सायंकाळी 5 च्या सुमारास घटनास्थळापासून 10 किमी अंतरावरील निलसनी-पेठगाव या घाटावर प्रतीक गिरडकर याचा मृतदेह गवसले होते. त्यानंतर आज सामदा घाटाच्या कडेला मृत मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. उडी घेणारे हे दोघेही प्रेमीयुगल होते व अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव येणार आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात, संयमाने आणि मर्यादेतच रहावं लागणार : पंतप्रधान
नरेंद्र मोदी
फडणवीस कोरोनामुक्त होऊन लवकर पुन्हा जनतेच्या सेवेत यावेत यासाठी गोपीचंद पडळकर समर्थकांनी चंद्रभागेच्या तीरावर विठुरायाच्या दूध आणि चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने घातला अभिषेक
LIVE : जगभरात खादीची चर्चा व्हायला लागली आहे, अमेरिकेतल्या ओहाका शहरात खादी आपण पोहचवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव येणार आहेत. ईद आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, वाल्मिकी जयंती आहे, मग, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छट पूजा, गुरू नानक देवजी जयंती आहे. कोरोनाच्या या संकटकाळात, आम्हाला संयमानंच वागावं लागणार आहे, मर्यादेतच रहावं लागणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 25 ऑक्टोबर रोजी देखील त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा देशवासियांना दिल्या.
हिंगोली : हिंगोली च्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील शेतकरी अवधूत मस्के ( वय वर्ष ३२ ) शेतामध्ये सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी गेले असतात त्यांना विषारी सापाने चावा घेतला असता त्यांचा जागीच मृत्यू झालाय. रंगराव मस्के यांना रुग्णालयात हिंगोली येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. रंगराव यांच्या पश्चात आई,भाऊ, पत्नी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे गोपाल सवंडकर या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतातील दीड एकर शेतामधील ऊस जळून खाक झाला आहे. तोडणी ला आलेला ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केल्याची शेतकऱ्यांनी माहिती दिलीय.
साताऱ्यातील राजघराण्याचे सिमोल्लंघन रद्द. कोरोनाच्या पाश्वभूमीवर खासदार उदयनराजेंचा निर्णय. दसऱ्याच्या पाश्वभूमीवर होणारे सिमोल्लंघन रद्द. जलमंदिर मधून निघणारी पालखीही रद्द.
कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली. एक नोव्हेंबरपासून खाजगी क्लास 15 ते 20 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत, सर्व नियम आणि सरकारी सूचनाचे पालन करत चालू करावे अशी मागणी क्लास चालकांनी केली. शाळा कॉलेजच्या शिक्षकांना पगार मिळतोय. मात्र, क्लास चालकांना उदरनिर्वाहचे दुसरे साधन नाही, क्लास भाडे आणि इतर खर्च सुरू असल्याने शासनाने क्लास चालकांच्या समस्याकडे लक्ष देण्याची मागणी करण्याचे निवेदन छगन भुजबळ यांना देण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती स्थिर आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राज्यात गाईच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. सर्व दूध संघाने एकत्रित येऊन गेल्या दोन दिवसापासून दुधाच्या दरात कपात केली. ही दर कपात 21 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. लॉकडाउन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावरती हळूहळू दरवाढ होत होती. मात्र, काही दूध संघाचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश संस्थांनी एकत्र येऊन दुधाच्या दरात दोन दिवसापासून पुन्हा कपात केली आहे. आता 3.5 फॅट 8.5 एफएनएस असलेल्या गाईचे दूर दूध वाहतूक कमिशन 24 रुपयांपर्यंत प्रति लिटर दराने खरेदी करावी असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून ते स्वत:च आयसोलेट झाले आहेत. संपर्कात असलेल्यांनी कोरोना चाचणी करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. अशा प्रकारे खासदाराच्या विरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा प्रकार राज्यात पहिल्यांदाच होत आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे आमदार-खासदार या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे दापोली विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमांना आपल्याला निमंत्रण देत नाहीत. तसेच आपल्याला विश्वासात न घेता कार्यक्रम करत असल्याचे कारण देत आमदार कदम यांनी हा प्रस्ताव दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुलोद सरकार आले तेव्हा त्यांनी मंत्रिपद भूषविले होते.
गुरुद्वाराच्या दसरा मिरवणुकीला हायकोर्टाची सशर्त परवानगी. दोन उघड्या ट्रकमधून मिरवणूक काढता येणार. पायी कोणीही चालणार नाही. गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने याचिकाकर्ता व सचिव रवींद्र सिंघ बुंगई हे या मिरवणुकीवर सनियंत्रण ठेवणार. अडीच किलोमीटर ऐवजी पावणे दोन किलोमीटर मिरवणुकीचा मार्ग राहील. दीड तासात मिरवणूक पूर्ण करावी लागणार. गर्दी होऊ नये तसेच नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र सचिव बुंगई यांना द्यावे लागणार; नियमांचे पालन करण्याची जबाबदारी व्यक्तिशः असेल. अटी शर्तीचे भंग झाल्यास त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. पोलीस आणि प्रशासनाने आवश्यक ती सुव्यवस्था राखली पाहिजे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींच्या कोविड चाचण्या बंधनकारकय ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख यांनी मांडली गुरुद्वारा बोर्डाची बाजू. राज्य सरकारने नाकारली होती परवानगी. याचिकेच्या विरुद्ध हायकोर्टात राज्य सरकारच्या वतीने महा अधिवक्ता कुंभकोणी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील, उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील यांनी बाजू मांडली. देशभरात अनेक धार्मिक उत्सवाला परवानगी दिली. केंद्र सरकार परवानगीच्या बाजूने आहे, मग राज्य सरकार का विरोध करीत आहे, असा युक्तिवाद गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने राजेंद्र देशमुख यांनी केला. वाटेल तितक्या अटी शर्ती टाका, परंतु 300 वर्षाची परंपरा मोडू नका, अशी मागणी राजेंद्र देशमुख यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व श्रीकांत कुलकर्णी यांच्या संयुक्त पीठाने दिला दिलासा. गुरुद्वारा बोर्डाची बाजू ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख यांनी मांडली.
बार्शी तालुक्यातील कळंबवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक उमाप यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आलाय. बार्शीतील आगळगाव ते उम्बर्गे या रोडवर गुरुवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. हत्या केल्यानंतर केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाणे येथे हजर झाले आहेत. बिभीषण विश्वनाथ उमाप आणि विश्वनाथ बाबू उमाप असे दोघा मुलगा आणि वडील असलेल्या आरोपींचे नाव आहे. या बाबत मयत त्रिंम्बक उमाप यांचा मुलगा गणेश उमाप याने पोलिसात फिर्याद दिली आहे. मयत त्र्यंबक उमाप हे आपल्या शेतातील उडीद पिकाची पट्टी घेण्यासाठी बार्शी बाजार समितीला जात असताना आगळगाव ते उम्बर्गे या रस्त्यावर आरोपींनी अडवून मारहाण केली. फिर्यादी गणेश उमाप याने जखमी वडिलांना ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचाराकरिता दाखल केले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. आरोपी विरुद्ध बार्शी तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
रविवार असुनही दसऱ्याच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्यास नोंदणी महानिरीक्षकांकडून परवानगी देण्यात आली आहे. कोकण विभाग, पुणे विभाग आणि नाशिक विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना ही परवानगी देण्यात आली. त्यामुळं या विभागातील नागरिकांना दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांच्या मालमत्तांची नोंदणी करता येणार आहे. फ्लॅटची खरेदी असेल, जमीनीची असेल किंवा आणखी कोणत्या मालमत्तेची खरेदी करण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणं पसंत करतात. दसऱ्याच्याच दिवशी या खरेदीची दस्त नोंदणी व्हावी अशीही त्यांची अपेक्षा असते. मात्र, यावेळी दसरा रविवारी असल्यानं मुहूर्तावर दस्त नोंदणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता विशेष परवानगी देऊन महाराष्ट्रातील तीन विभागांमधे रविवारी देखील दस्त नोंदणी करण्यासाठी सोय करण्यात आलीय.
भाजपला आणखी एक धक्का, अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेच्या वाटेवर. उद्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार. गीता जैन यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. अपक्ष आमदार गीता जैन यांनी भाजपला समर्थन दिले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक सुरू, बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार अनिल परब, विजय वडेट्टीवार व्हीसीद्वारे तर मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित आहेत
राज्य सरकारने अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना दिलेल्या पहिल्या टप्प्यातील मदतीवर समाधानी. पण सरकारने शेतकऱ्यांना दुसरा टप्पा देखील द्यावा. केंद्र सरकारचे पैसे देखील तात्काळ मिळायला हवेत. सरकारने दिलेल्या या पैशाने शेतकऱ्यांचे काहीही होणार नाही पण शेतकऱ्यांनी खचू नये. आपण पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा राहूया : संभाजीराजे छत्रपती
औरंगाबाद आयपीएल सट्टा प्रकरणी सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 7 महिला शिक्षिका. लॉकडाउनपूर्वी शाळेत शिकवत होत्या. लॉकडाऊनमुळे नोकरी गेली त्यामुळे आयपीएल सट्टा प्रकरणी धाड टाकली तेव्हा तिथल्या कॉल सेंटरला काम करत होत्या.
गोंदीया : कोरोनाने मृत पावलेल्या गर्भवती महिलेच्या मृतदेहावरील दागिने लंपास करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगांव येथे समोर आली असून आरोग्य व्यवस्थेचे परत एकदा धिंधवडे निघाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील एका कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूपश्चात अंगावरील सोन्याचे दागिने परत करण्यात आले नसून हे दागिने परत करा अशी मागणी बाधित महिलेच्या पतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे केल्याने संपूर्ण बाब उघड झाली आहे.
अतिवृष्टी शेतकरी मदतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावली, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता
मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातून तीस वर्षे जुन्या ट्रॉफिज चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणामुळे विद्यापीठचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई विद्यापीठच्या मरीन लाइन परिसरात असलेल्या क्रीडा संकुलातील 30 ते 35 वर्ष जुन्या ट्रॉफी चोरीला गेल्याच समोर आलं आहे. त्यामध्ये 1 चांदीची ट्रॉफीसुद्धा चोरीला गेल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडीस आल्यानंतरसुद्धा अद्याप याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार मुंबई विद्यापीठाकडून दाखल केली नाही. मुंबई विद्यापीठातील या परिसरात सीसीटीव्ही लावले नसल्याने चोरी कशी झाली, किती ट्रॉफी चोरीला गेल्या याचीसुद्धा माहिती मुंबई विद्यापीठकडे नसून याबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठ कलिना, फोर्ट परिसर आणि विविध विभागांत अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे यांनी मागील अनेक वर्षापासून लावून धरली होती. तरीसुद्धा मुंबई विद्यापीठाला अद्याप जाग आलेली नाही.
अनेक महत्त्वाच्या ट्रॉफीज्या मुंबई विद्यापीठने अनेक महत्त्वाच्या स्पर्धेत कमावल्या, त्या सगळ्या चोरीला गेल्याने आता याची जबाबदारी कोण घेणार? अस प्रश्न सिनेट सदस्य व विद्यार्थी संघटना विचार आहेत.
भाजपा आमदार डॉ. संजय कुटे आक्रमक, जिगाव धरण प्रकल्पग्रस्ताच्या मागणीसाठी आंदोलन, कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन, अजूनही जिल्ह्यधिकारी कार्यालयातच ठिया, काल रात्रभर जिल्ह्यधिकारी कार्यालयात मुक्काम व जेवन, प्रशासनाने स्वच्छता गृहदेखील प्रशासनाने बंद केलेत
जिगाव धरण प्रकल्पग्रस्ताच्या मागणीसाठी भाजपा आमदार डॉ. संजय कुटे आक्रमक. कालपासून जिल्ह्यधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले आहे. अजूनही जिल्हाधिकारी आंदोलन सुरु आहे.
अहमदनगर -
संतप्त शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांची अडवली गाडी...
पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्यांनी अडवली हसन मुश्रीफ यांची गाडी ...
शेतकऱ्यांनी रस्त्यात आडवून सडलेला कांदा आणि जळलेली पिके दाखवली...
पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणीसाठी मुश्रीफ आले होते...
आठ दिवसात भरपाई मिळेल मुश्रीफ यांचं आश्वासन...
वकिलांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची अखेर मुभा. मात्र, प्रवास करताना वेळेचे बंधन. सकाळी लोकल सुरू झाल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 नंतर शेवटची लोकल असेपर्यंत प्रवासास मुभा. गर्दीच्या वेळी वकिलांना प्रवास करता येणार नाही. मासिक पासही मिळणार नाही, प्रत्येक प्रवासासाठी जाताना आणि येताना वेगवेगळे तिकीट काढावे लागणार. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या अधिकृत ओळखपत्रावरच तिकीट मिळणार. अधिकृत कामासाठीच प्रवास करता येणार, खाजगी कामासाठी प्रवास करता येणार नाही. लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळावी यासाठी वकिलांनी घेतली होती मुंबई उच्च न्यायालयात धाव. वकील आणि त्यांच्याकडील नोंदणीकृत कारकून लोकलने प्रवास करू शकणार.
आरपीआयच्या दोन गटात राडा. अंतर्गत गटबाजीतून शासकीय विश्रामगृहावर मारामारी. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा पंढरपूर दौरा होता. आठवले यांची पाठ फिरताच राड्याला सुरवात.
जीएसटी भरल्याची खोटी बीलं सादर करुन सरकारची 52 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल तुषार मुनोत या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. यासाठी तुषार मुनोतने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये बनावट कंपन्यांची नोंद केली होती. या बनावट कपन्यांच्या नावे खोटी बीलं त्यानं तयार केली होती. या कंपन्यांनी 317 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचं त्याने कागदोपत्री दाखवलं होतं आणि त्या बदल्यात 52 कोटी रुपयांचे टॅक्स क्रेडिट मिळवलं होतं. जीएसटीच्या पुणे विभागीय कार्यालयाला याची माहिती मिळाल्यानंतर तुषार मुनोतचा शोध घेण्यात येत होता. मात्र, तुषार मुनोत गायब झाला होता. अखेर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एका गावातुन त्याला अटक करण्यात आली. तुषार मुनोत सोबत या फसवणुकीत आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा शोध सुरू असल्याचं जीएसटी संचालनयाकडून सांगण्यात आलंय.
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा आज सायंकाळच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात काही मंडळात सोसाट्याचा वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह झोडपले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी यांची कोरोना लॉकडाऊनमधली पहिली प्रचारसभा. मोदी बिहार मधील सासाराममध्ये प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. उद्याच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही बिहारमध्ये पहिली सभा आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची एकत्रित सभा असणार आहे. एकाच दिवशी मोदी आणि राहुल गांधी यांचा बिहार प्रचार अभियान सुरू होणार आहे.
सोलापूर-
सोलापुरात कांद्याचे भाव घसरले, जवळपास दीड ते 2 हजार रुपये प्रति क्विंटल घसरण,
दोन दिवसांपूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 8 हजार रुपये पर्यंत दर होता,
काल देखील कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 5 ते साडे सात हजार रुपये होता दर,
,
आज मात्र घसरण होऊन 4 ते 6 हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर,
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जवळपास 130 ट्रक कांद्याची आवक,
महिलानंतर आता मुंबईत खासगी सुरक्षा रक्षकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास मुभा. राज्य सरकारचे रेल्वेला या संदर्भात पत्र. गणवेशधारी सुरक्षा रक्षकांना लोकल ट्रेन प्रवेश मिळणार. अधिकृत आयडी वर ट्रेनमध्ये प्रवेश मिळणार आहे.
अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या खोट्या विक्रीचे बनावट देयके सादर करून सरकारी तिजोरी ला तब्बल 135 कोटींचा चुना लावल्याचे प्रकार उघडकीस आले आहे..
जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने म्हणजेच डिजीजीआयच्या नागपूर झोनल युनिटने हा "जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडीत घोटाळा" उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे भंडारापासून नंदुरबारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बनावट देयकांच्या आधारे खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय असून घोटाळा करणाऱ्या तथाकथित 22 कंपन्यांपैकी एकाच्या म्होरक्याला नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथून अटक करण्यास डिजीजीआयला यश आले आहे. तर इतरांचे शोध घेतले जात आहे. घोटाळा करणाऱ्या 22 कंपन्या भंडारा, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, धुळे आणि नंदुरबारच्या आहेत. 135 कोटींच्या घोटाळ्याची 22 कंपन्यांनी तब्बल 1 हजार 83 कोटींची बनावट देयके सादर करत हा घोटाळा केला.
जालना जिल्ह्यातल्या वाटूरमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरीच चोरट्यानं पळवून नेल्याची घटना घडली. वाटूरमधील जयपूर रोडवरील मार्केट कमिटीत जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. सुरुवातीला चोरट्यांनी बँकेचं शटर उचकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसल्यानंतर बँकेच्या पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. बँकेतील तिजोरी फुटली नसल्यानं चोरट्यांनी तिजोरीच पळवून नेली. या तिजोरीत 6 लाख 62 हजार 900 रुपये असल्याची माहिती बँक मॅनेजरनं दिली आहे. त्याचबरोबर बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिव्हीआरही चोरट्यांनी चोरून नेलाय. विशेष म्हणजे हे सर्व पैसे विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना वाटपासाठी आलेले होते. दरम्यान सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतिर्थावर न होता तो समोरच असलेल्या स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेली असताना, शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा खास महत्त्वाचा होता. मात्र यंदाच्या सोहळ्यात जाहीर सभा न होता तो एका सभागृहात निवडक 100 मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांची भाषण समाजमाध्यमांवरनं राज्यभरातील शिवसैनिकांसाठी थेट प्रक्षेपित केली जातील.
थकवा जाणवत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार क्वॉरन्टाईन झाले आहेत. त्यांची कोरोनाचाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. कालपासून अजित पवारांनी आपल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात होणारा जनता दरबारही रद्द करण्यात आला आहे. मात्र दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.
पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीकडून आणखी 24 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण 178 जणांना अटक केली आहे.
अमरावती विद्यापीठाची उद्या 22 ऑक्टोबर रोजी होणारी नियोजित परीक्षा पुढील आदेशपर्यंत स्थगित. 22 ऑक्टोबर पासून होणाऱ्या परीक्षा पुन्हा स्थगित. 20 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे विद्यापीठाचा निर्णय. 20 ऑक्टोबरला परीक्षा, 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित आणि आता उद्यापासून होणाऱ्या परीक्षा पुन्हा पुढील आदेशपर्यंत स्थगित केल्याची माहिती विद्यापीठाने परिपत्रक काढून दिली.
दिल्ली विशेष पोलीस आस्थापना अंतर्गत सीबीआयला राज्यात येऊन तपास करायचे अधिकार होते. पण आता राज्य सरकारने ही consent withdraw केली आहे. यामुळे राज्य सरकार विरुद्ध सीबीआय होण्याची दाट शक्यता. याआधी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय प्रकरण झाले आहे.
मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार. फडणवीस मुख्यमंत्री असताना 2015 साली अॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपली आहे. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत उच्च पदावर असल्याने 2015 साली सरकारने पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता. अॅक्सिस बँकेबरोबरचा करार संपल्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते. एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलिसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय. एचडीएफसी बँक पोलिसांनी देणार 10 लाख रुपयांचं विमा कवच देणार आहे. नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखाचे विमा संरक्षण. अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच. अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच. अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी. रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत. अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्यांना एचडीएफसी बँक देणार
निफाड तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु. शेतात काम करत असताना भीमराव जगताप (वय 60 नांदूरडी) आणि सुनीता शिंदें (वय 40 श्रीरामनगर) यांचा वीज पडून मृत्यू झाला.
त्रंबकेश्वरचे माजी नगरअध्यक्ष धनंजय तुंगार यांची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. दुपारच्या सुमारास त्रंबकेश्वर नगरीपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या गंगाद्वारच्या पायथ्याशी धनंजय रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, पोलिसांनी शिताफीने तपास चक्र फिरवताच समीर नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. प्रथमदर्शनी आर्थिक वादातून हत्या झाल्याची माहिती मिळत असली तरी इतर काही गंभीर कारण असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून हत्येच कारण आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे. हत्येच्या घटनेनं धार्मिक नगरी हादरली आहे.
आधी कांदा निर्यात बंदी केली, आता बाहेरच्या कांदा उत्पादकांना देशात पायघड्या. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारच्या हालचाली. हे सगळं कांद्याला चार महिन्यांपूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून बदलल्यानंतर सुरू आहे. गेल्या दहा दिवसात कांद्याचे भाव बारा रुपयांवरून पन्नास रुपये किलोच्या पार पोहोचले आहेत. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचा केंद्र सरकारचा दावा. जे कांदा उत्पादक देश आहेत तिथून भारतातल्या आयातीसाठी त्या-त्या दूतावासांना विशेष आदेश देण्यात आले आहेत. आयातीवर कांद्याला लागणारी इन्स्पेक्शन फी देखील माफ करण्यात आली आहे.
अमरावती विद्यापीठाची उद्या 22 ऑक्टोबर रोजी होणारी नियोजित परीक्षा पुढील आदेशपर्यंत स्थगित. 22 ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षा पुन्हा स्थगित. 20 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे विद्यापीठाचा निर्णय. 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित आणि आता उद्यापासून होणाऱ्या परीक्षा पुन्हा पुढील आदेशपर्यंत स्थगित केल्याची माहिती विद्यापीठाने परिपत्रक काढून दिली.
एकनाथ खडसेंचे पक्ष सोडणे कार्यकर्ता म्हणून धक्कादायक, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. त्यांनी पुनर्विचार करावा आणि गेलेच तर सुखी राहावे, भाजप कुण्या एकाचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे या घडामोडीवर चिंतन करण्याची गरज, भाजप विस्तारात खडसेंचे मोठे योगदान आहे. खडसेंनी राष्ट्रवाद जोपासणारा पक्ष ते राष्ट्रवादाचा बुरखा घालणाऱ्या पक्षात जाणे वेदनादायी, सत्ता नसताना त्यांनी कार्यकर्ता बांधून ठेवला आता त्यांचा धीर खचला याबद्दल आश्चर्य.
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे स्पष्ट झाल्यावर अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. आज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होतोय, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्यामुळे पंकजा यांनं शिवसेनेत येण्याची विनंती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे. आता आवाहनाला पंकजा मुंडे कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाशिक: त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची भर दिवसा धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. गंगाद्वारच्या पायथ्याशी त्यांचा खून झाला. त्यांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र खुनाचे करण अद्याप समोर आलेलं नाही.
BIG BREAKING | एकनाथ खडसेंनी भाजप सोडलं, आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटील यांची माहिती @EknathKhadseBJP @Jayant_R_Patil #eknathkhadse https://www.youtube.com/watch?v=_-EXOeUjd3g
"एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी पक्षांतील प्रवेशाचा दररोज नवीन मुहूर्त ऐकतोय, माध्यमांतूनच खडसेंच्या मुहूर्ताबद्दल ऐकायला मिळते, मात्र खरं तर यांबद्दल एकनाथ खडसेच भूमिका सांगू शकतील, तुम्ही आम्ही काय सांगणार." विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रतिक्रिया.
मोबाईल आणि इंंटरनेट यूजर्ससाठी मोठी बातमी आहे. भारतात जिओकडून 5जी मोबाईल नेटवर्कची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. क्वॉलकॉमच्या मदतीने रिलायन्स जिओला मोठं यश मिळालं आहे.
रेल्वे बोर्डाने काही पॅसेंजर रेल्वेगाड्यांना सणासुदीच्या काळात एक्स्प्रेस गाड्या म्हणून चालविण्याची मान्यता दिली आहे.
रेल्वेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांनी काही रेल्वेगाड्यांच्या दर्जामध्ये सद्यस्थितीत बदल करण्यासंदर्भात शिफारस केली होती. त्यानुसार पॅसेंजर ट्रेनला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यात पुणे - निजामाबाद- पुणे (51421/22), निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद (51433/34), दौंड - नांदेड - दौंड (57515/16), हैदराबाद - पूर्णा - हैदराबाद (57547/48), हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद (57549/50), काचिगुडा - नगरसोल - काचिगुडा (57561/62), हैदराबाद - परभणी - हैदराबाद (57563/64), अकोला - पूर्णा - अकोला (57583/84) या गाड्यांचा समावेश आहे.
दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेना हल्ला, सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना, पोलिस कर्मचारी दत्ता डोलारे गंभीर जखमी,
ढाब्यावरून जेवन करून परतताना रॉडने केली मारहाण , सातारा शहर पोलिस ठाण्यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल, आरोपी प्रसाद महामुनेला अटक तर एक फरार
मुंबई लोकलमध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीत राज्य सरकार कडून मंत्री, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, सचिवलायतील अधिकारी तर रेल्वे कडून डी आर एम आणि इतर वरिष्ट अधिकारी सहभागी होतील. बैठकीचा मुख्य मुद्दा, सर्वांना लोकल प्रवासाला मुभा दिल्यास गर्दी कमी कशी करता येईल, त्यांच्या साठी वेळेचे बंधन ठेवावे का, काय नियम असावे, किती लोकल सोडल्या जाव्या, आणि क्यू आर कोड प्रमाणे काही यंत्रणा असावी का असे असण्याची शक्यता आहे. मात्र गेले 7 महिने लोकल बंद असताना, एखादी ठोस यंत्रणा राज्य सरकार आणि रेल्वेला उभी करता आली असती. ती निर्माण करण्यात दोन्ही प्रशासन कमी पडले आहे. कार्यालयीन वेळेत बदल करण्यात आला असता मात्र तो देखील राज्य सरकार कडून करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास पुन्हा आधी प्रमाणेच गर्दी होणार हे निश्चित आहे.
गडचिरोलीत एक प्रवासी नाव बुडाल्याने अनेक जण बेपत्ता झाले आहेत. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील
सिरोंचा तालुक्यात असलेल्या इंद्रावती नदीत ही घटना घडली. बोटीतून प्रवास करत असलेले तेरा जण सुरक्षित बाहेर पडले, परंतु आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथुन छत्तीसगड राज्यात एका कार्यक्रमासाठी हे प्रवासी दोन लहान नावेने गेल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रम आटोपून परत येताना काल संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील दुर्गम नक्षलग्रस्त भागात ही घटना घडल्याने प्रशासनाला उशिरा माहिती मिळाली. शोधमोहिमेत वन विभाग आणि पोलिसांची टीमचा समावेश असून युद्धपातळीवर बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
नंदुरबार : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला आहे. जळगावहुन सुरतकडे जाणारी ट्रॅव्हल्स कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळ पुलावरून 10 ते 15 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मयतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुण्यात विजेच्या कडकडटासह पावसाला सुरुवात
शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान त्याची पाहणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेती बांधावर जाऊन केली.. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला.. तर दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणार यासाठी सरकार कटिबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले...
अमरावती विद्यापीठाची उद्या 21 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा स्थगित...
22 ऑक्टोबर पासून होणाऱ्या परीक्षा नियमित होणार...
आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे विद्यापीठाचा निर्णय...
21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा 8 नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती विद्यापीठाने परिपत्रक काढून दिली...
LIVE UPDATES | मास्कचे नवे दर 3 रुपयापासून 127 रुपये मास्क दर निश्चितीबाबत राज्य सरकारने काढले आदेश
उद्या पासून सर्व महिलांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वे आणि राज्य सरकारच्या नाराजी नात्यानांनंतर रेल्वेने मुभा आहे.
उद्यापासून सर्व महिलांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा , रेल्वे आणि राज्य सरकारच्या नाराजी नात्यानांनंतर रेल्वेने दिली मुभा, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती
बोर्डाकडून दहावी बारावी ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 पुरवणी परीक्षाचं वेळापत्रक जाहीर, दहावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, तर बारावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत. सणासुदीच्या काळात आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. मोदींचं हे सातव्यांदा देशाला संबोधन आहे.
बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा टप्पा यशस्वी झाला असून आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला लवकरच प्रारंभ होणार आहे.
लसीच्या तिसऱ्या टप्प्याला ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. लस दिलेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेत काय,रोगप्रतिकारक शक्ती किती तयार झाले याची माहिती लस दिल्यानंतर घेतली जाते.लस दिलेल्या व्यक्तींचा अहवाल वेळोवेळी कंपनीकडे पाठवला जातो.तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी अडीचशे व्यक्ती निवडण्यात आले आहेत.तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये काही मधुमेही व्यक्तींचाही समावेश आहे.झायडस कॅडीला कंपनीतर्फे देखील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये लसीची चाचणी सुरु आहे.दुसऱ्या टप्प्यात 175 जणांना लस देण्यात आली असून लस घेतलेल्यांची तपासणी सुरु आहे.
अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेचा तिसऱ्यांदा बोजवारा. ऑनलाइन परीक्षेचं ॲप लॉग-इन होत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल. याआधी दोनवेळा तांत्रिक अडचणीमूळे परिक्षा ढकलली होती समोर. अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे हाल. गोंधळावर विद्यापीठाची चुप्पी.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व्हरचा आजही डाऊन झाला. सकाळच्या सत्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी लाॅगइन करणाऱ्या विद्यार्थ्यांना site can’t be reached असा मेसेज येत आहे. काल दुपारीही विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे परीक्षा देताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.
बुलढाणा : शेगाव येथून शेतात मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला, यातील जवळपास 30 ते 35 गंभीर जखमींना शेगाव येथील सईबाई मोटे शासकीय रुग्णालयात आणले असता या रुग्णालयात डॉक्टरच गैरहजर असल्याने रुग्णालयातील नर्स आणि वार्डने उपचार सुरु केले आहेत, येथे गंभीर रुग्ण अक्षरशः जमिनीवर विव्हळत पडले होते. रुग्णालायाच्या या गलथान कारभारामुळे येथे थोडा वेळ तणावाचं वातावरण झालं होतं. या आपघातातील काही गंभीर जखमींना अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठविन्यात आलं आहे.
नागपूरात 24 तासात तीन हत्याच्या घटनांचा तपास पूर्ण झालेला नसताना आता वर्धमान नगर भागात 10 लाखांची घरफोडी ची घटना घडली आहे. वर्धमान नगर परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरातून 5 लाखांची रोकड, 5 लाखांचे दागिने असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे. संबंधित कुटुंब मुलाच्या वाढदिवसासाठी गेले 2 दिवस पेंच अभयारण्यात गेलेले असताना आज परत आल्यावर घरात घरफोडी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील करंजखेडा गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या गावातील शेतकऱ्यांच्या नदीकाठी असलेल्या 20 विहिरी गाळाने बुजल्या आहेत. 40 ते 50 फूट विहिरीत शेतशिवरतील गाळ वाहून आल्याने विहिरी बुजल्या आहेत.
नागपुरात 24 तासात तीन हत्याच्या घटनांचा तपास पूर्ण झालेला नसताना आता वर्धमान नगर भागात 10 लाखांची घरफोडीची घटना घडली आहे. वर्धमान नगर परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरातून 5 लाखांची रोकड, 5 लाखांचे दागिने असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे. संबंधित कुटुंब मुलाच्या वाढदिवसासाठी गेले 2 दिवस पेंच अभयारण्यात गेलेला असताना आज परत आल्यावर घरात घरफोडी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कोरोनामुळे करवीर नगरीतील यंदाचा शाही दसरा सोहळा रद्द करण्याचा निर्णय. इतिहासात पाहिल्यांदाच दसरा चौकात होणारा शाही सोहळा रद्द करण्याची वेळ. मैसूरनंतर देशातील दोन नंबरचा मोठा शाही दसरा सोहळा म्हणून ओळखला जायचा. छत्रपती घराण्यातील मंडळी यावर्षी मेबॅक कारमधून येताना पाहायला मिळणार नाही. श्रीमंत शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निर्णय. शहरात इतर सार्वजनिक ठिकाणी देखील दसरा साजरा करता येणार नाही.
महाबळेश्वरातील घोडेस्वारी, बोटिंग आणि काळ्या पिवळ्या टॅक्सींना परवानगी. अटी शर्ती लागू करुन सातारा जिल्हाधिकाऱ्यांची संमती. आठ महिन्यांपासून महाबळेश्वरातील घोडेस्वारी बोटींग आणि टॅक्सी बंद होत्या. पर्यटनाला परवानगी दिल्यानंतरही या तीन गोष्टी होत्या बंद.
अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसंच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत. व्हायरल फ्लू असावा असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. मात्र कोरोनाच्या स्थितीत खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करुन घेतलं आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.
राज्य चालवायला हिम्मत लागते. केंद्राकडे निधी मागणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंना फडणवीस म्हणाले थिल्लर. केंद्राकडे कोणत्याही प्रकारचे येणे बाकी नाही. दिशाभूल करु नका, नुकसान भरपाईचे बोला. तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलाय. पंतप्रधान मोदीजी लडाखला जातात. तुम्ही मोंदीची तुलना करुन घेवू नका.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत शासकीय सदस्य म्हणून काम पाहतील. शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, क्रिकेटर संदिप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत कार्यरत असेल.
सांगली : जिल्ह्यातील पूर्वेकडील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या दुष्काळी तालुक्यात कधी नव्हे तो ओला दुष्काळ सारखी परिस्थिती झाली आहे. आटपाडी तालुक्यात 2 महिन्यात दोन वेळा अतिवृष्टी झालीय. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसात डाळींबाचे मोठे नुकसान झाले असतानाच पुन्हा ऑक्टोबरमध्ये झालेला परतीचा पाऊस डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्धवस्त करून गेला आहे. आटपाडी तालुक्यातील हजारो हेक्टर वरील डाळींब हंगाम या अस्मानी संकटाने वाया जाणार आहे. अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी तालुक्यात पावसाने आत्तापर्यंत साडेपाचशे मिलिमीटरची नोंद गाठली आहे. अतिपावसामुळे तालुक्याचे हुकमी फळपीक असलेल्या हजारो एकर डाळिंबाचे क्षेत्र पाण्यात बुडाले असून शेतीच्या इतिहासात यावर्षी सर्वाधिक विक्रमी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .
आटपाडी तालुक्यातील डाळींबाचे क्षेत्र 7 ते 9 हजार हेक्टरवर होते.गेल्यावर्षी 800 टनाच्या आसपास डाळींब निर्यात झाले होते. त्यामुळे यंदा नुकसान हे सुमारे 500 कोटी इतके आहे.
तब्बल 8 महिन्यांनी मुंबई मेट्रो आजपासून पुन्हा रूळावर धावणार आहे. सकाळी 8 पासून ते रात्री 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत आता मुंबईकरांना हा मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. कमी वेळात पूर्वीसारखा सुखकर प्रवास व्हावा यासाठी सकाळापासून मुंबईकर रांगेत मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करताय. अटी, नियम, शर्तीमध्ये हा प्रवास केला जात आहे.
पुणे : पुण्यापासुन साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उरळी कांचन परिसरात रविवारी दुपारी ढगफुटी झाल्याने बाजारपेठेत मोठमोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. उरळी कांचनपासुन पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळती घाटात रविवारी दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. वळती आणि शिंदवणे या गावात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हे दोन्ही बंधारे फोडून पाण्याला वाट करुन देण्यात आली. त्यामुळे या गावांमधुन उरळी कांचनला जाणार्या ओढ्याला पुर आला. या पुरामुळे ओढ्याच्या काठावरील अवैध बांधकामं आणि अतिक्रमणांना मोठा फटका बसला. अनेक घरांमध्य पाणी शिरलं. पुढं हे पाणी उरळी कांचनमधे घुसलं आणि संपूर्ण शहरात पसरलं. पुणे - सोलापुर महामार्गावर असलेल्या या उरळी कांचनमधे मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी तिथं तळ ठोकून आहेत.
पार्श्वभूमी
मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये काल रात्री भीषण आग लागली. गेल्या दहातासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलला रात्री 9 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाईल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलभर पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आली. आग विझवण्यासाठी गेल्या दहा तासांपासून अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सिटी सेंटर मॉलमध्ये जवळपास 200 हून अधिक दुकानं आहे. या सर्व दुकानांमध्ये मोबाईल अॅक्सेसरीजची दुकानं जास्त आहेत. त्यामुळे या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या कामाविषयी समाधानी : संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करत आहे. मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील मराठा आरक्षणासाठी योग्य ती कारवाई केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कामाबद्दल मी समाधानी आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला होता. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी हे वक्तव्य केलं आहे.
वर्षा बंगल्यावरील संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री यांच्यात काल बैठक झाली. यानंतर संभाजीराजे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, नुकताच महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. ओला दुष्काळ जाहीर केला तर केंद्राकडून अधिक मदत मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरा वेळी राज्य सरकारने केंद्राकडे 2800 कोटींची मागणी केली होती. परंतु त्यावेळी 900 कोटी ही आले की नाही याबद्दल शंका आहे. आम्ही केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे . लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकार तयार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेला आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
बिहारमध्ये आज एकाच दिवशी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्या जाहीर सभांनी रणधुमाळीला सुरुवात
बिहार विधानसभेच्या रणांगणात आज पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आमने-सामने असणार आहेत. दोन्ही नेते आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात आज एकाच दिवशी करत आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता बिहारमधल्या सासाराम इथे प्रचार सभेला संबोधित करतील. कोरोना काळात त्यांची ही पहिली जाहीर सभा असेल. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची एकत्रित सभा ही उद्याच होणार आहे.
भाजपने गुरुवारी आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक बिहारवासियांना मोफत कोरोना लसीची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आजच्या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे लक्ष असेल. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या स्वतंत्र लढण्यावरून खूप वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यांना आतून भाजपचा पाठिंबा आहे का अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याही बाबतीत मोदी पक्षाची भूमिका स्पष्ट करणार का? नितिशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हे पुन्हा ठणकावून सांगणार का हे पाहावं लागेल.