Maharashtra Rain Update | मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. राज्यात पुणे, लातूर परभणी, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव, सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले असून त्यामुळे गावांतही पाणी शिरलं आहे. तर अनेक ठिकाणी शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणं तुडूंब भरली आहेत. मुंबईवरीलही पाणी कपातीचं संकट टळलं असून मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणं भरली आहेत.


उस्मानाबादेत मुसळधार!


मध्यरात्री अडीचच्या सुमारास अर्धा तास ढगांच्या गडगडाटासह उस्मानाबादेत पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही पहाटे पर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान दुष्काळी पट्ट्यासह महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसाने शेतात पाणी थांबल्याने काढणीला आलेला खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे.


पंढरपुरातही पावसाची दमदार हजेरी


सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दाणादाण उडवून दिल्याने काल रात्रीपासून पंढरपूर पुणे आणि पंढरपूर सातारा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कालच्या पावसाने ओढ्यांनाही पूर आल्याने पंढरपूर पुणे रोडवरील भांडीशेगावच्या पुलावर पाणी आल्याने पुणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी अडकून पडले आहेत. याच पद्धतीने पंढरपूर सातारा रोडवरील उपरी येथील कासाळ उद्याही महापूर आल्याने साताराकडे जाणारी वाहतूक काल सायंकाळपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे उपरीची स्मशानाभीमी वाहून गेली असून ओढ्याच्या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.


लातूर जिल्ह्यातील औसा परिसरात रात्री जोरदार पाऊस


रात्रीच्या पावसाचा कहर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस औस उंबडगा रस्ता बंद पाण्याखाली पुल काल रात्रीला बारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र कहर माजवलाय लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अनेक गाव शिवारात पावसाने जोर दिल्याने औसा उंबडगा या दोन गावाना जोडणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असुन वाहतूक बंद झाली आहे. तर सध्याला शेतात उभे असलेल्या सोयाबिन पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून सोयाबिन पिकातून हातात चार पैसे मिळण्याची आशा असताना शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आता घरप्रपंचाचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.


सांगलीतही पावसाचं थैमान


सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील भागात आजपर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस आहे. आधीच कृष्णा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याने टेंभू योजनेच्या माध्यमातून या भागातील तलाव, बंधारे भरून घेण्यात आले होते. त्यामुळे या पावसाने लगेच पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात तीन मंडळात मध्यरात्री अतिवृष्टी झाली आहे. कुरुंदा 93, हयातनगर 89, आंबा मंडळात 72 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कापणीला आलेल्या सोयाबीनच्या उभ्या पिकात सध्या गुडघ्याइतके पाणी साचल्याचे चित्र बघायला मिळते. त्याचबरोबर नदीकाठच्या जमिनीचा सुपीक भाग देखील वाहून गेला आहे. सकाळी पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात गर्दी केली असल्याचेही बघायला मिळाले. पावसामुळे आटपाडी मधील एका घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


पाहा व्हिडीओ : तीन एकरावरील उडदाचं पीक भिजून खराब,बाजारपेठेत जाण्यासाठीचा तयार माल वाया,शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू



औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झालाय. या पावसामुळे ग्रामीण भागात दाणादाण उडालीय. लहान नद्यांना, ओढ्याना पूर आला तर पिके आडवी झाली आहेत. या वर्षातला सर्वाधिक मुसळधार पाऊस रात्री झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरले. कन्नड तालुक्यातील करंजखेड, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात पाऊस नव्हे तर आपत्ती आल्यासारखी स्थिती होती. जोरदार पाऊस झाला. डोंगराळ भागामुळे पावसाचा पाण्याचा ओघ गावात होता. नदी नाल्यांना मोठा पूर आला. सर्व पाणी शेतात साचले तर गावात गुडघ्याच्याही वर पाणी दिसत आहे. पूर्ण रात्र नागरिकांनी जागून काढली आहे.


पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील अग्नावती प्रकल्प गेल्या जुलै महिन्यातच यावर्षी पावसाने तुडुंब भरला आहे. त्यानंतर अग्नावती नदीला सप्टेंबरपर्यंत चार वेळेस महापूर येऊन गेला, तसेच दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्नावती नदीला पुन्हा एकदा महापूर आल्यामुळे अनेक छोटी मोठी दुकाने वाहून गेली. छोट्या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला व्यवसायिक व इतर व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तसेच गावातील अग्नावती नदीवर पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. नदीपात्रातील छोट्या मोठ्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानातील सामानाची नासधूस झालेली आहे. त्यामुळे सर्व दुकानदारांनी त्वरित पंचनामा करून मदत मिळण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.


हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहिले आहेत. त्याचबरोबर कुरुंदा गावाच्या मध्यभागातून वाहणारी जलेश्वर नदीला देखील पूर आला आहे. ही नदी गावाच्या मध्य भागातून वाहत असल्यामुळे काही प्रमाणात नदी शेजारील असलेल्या परिसरामध्ये कमरे इतके पाणी शिरले होते. मात्र, पावसाने पहाटेच्या सुमारास विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.


बुलढाणा जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने जिल्हयातील 81 पैकी 65 लघुप्रकल्प तर जिल्ह्यात सातही मध्यम प्रकल्प 100 टक्के भरलेत आणि जिल्ह्यातील तिन्ही मोठे प्रकल्प ऑगस्ट मध्येच भरल्याने त्यातून विसर्ग सुरु आहे. जिल्ह्याची सिंचन क्षमता 533.56 दशलक्ष घन मीटर असून सध्या जिल्ह्यात 479.62 दशलक्ष घनमीटर इतका म्हणजे 89.89 टक्के साठा आहे. एकंदरित जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने यंदा सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


राज्यात आजही मुसळधार पाऊस; अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती