सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत तर माणगंगा नदीला पूर आला आहे. तसेच पावसामुळे आटपाडी मधील एका घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातले अनेक तलाव भरून गेले आहेत. आटपाडी तालुक्यातील भागातील आजपर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस आहे. आधीच कृष्णा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याने टेंभू योजनेच्या माध्यमातून या भागातील तलाव, बंधारे भरून घेण्यात आले होते. त्यामुळे या पावसाने लगेच पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तलाव ओसंडून वाहत आहेत तर शुक्रवारी दिवसभर संततधार आणि मुसळधार पडलेल्या पावसामुळे माणगंगा नदीला पूर आला आहे. त्याचबरोबर अनेक गावातील नाले आणि ओढे सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी असणारे छोटे बंधारे, पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. निंबवडे-आटपाडी, म्हसवड-आटपाडी, आटपाडी-दिघांची आणि लिंगेवर-राजेवाडी हे पूल पाण्याखाली गेल्याने येथील जवळच्या गावांचा संपर्क तुटला आहे.


त्याबरोबर आटपाडी शहरातल्या शुक ओढ्यालाही पूर आलेला आहे. या ठिकाणी असणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्याबरोबर ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या आटपाडी ग्रामपंचायत जवळचे सुमारे 40 हून अधिक दुकानांमध्ये ओढ्याच्या पुराचं पाणी शिरलं आहे. आटपाडी शहरातल्या सागर मळा या ठिकाणी असणाऱ्या प्रकाश कुंभार यांच्या घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या मुली ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वैशाली प्रकाश कुंभार (वय 2) व तृप्ती प्रकाश कुंभार (वय 3) या दोघा बहिणींची मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


महत्वाची बातमी


Maharashtra Rain Update | राज्यात आजही मुसळधार पाऊस; अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती


शेती जगत | शेती क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा | गावागावात काय आहे शेतीची परिस्थिती? 18 सप्टेंबर 2020