मुंबई : राज्यात पुणे, लातूर परभणी, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव, सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले. तर काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. घरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणं तुडूंब भरली आहेत.


लातूर जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाचा चांगलाच जोर पहावयास मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर, लातूर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. उदगीर भागात एकाच दिवसात 155 मिलीमीटर, औराद शहाजनी भागात 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणार करण्यात येते. ह्या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले आहे. चारपाच दिवसापासून सूर्यदर्शन नाही. सतत ढगाळ वातावरण आहे. शेतात पाणी थांबलेले आहे. यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडत आहेत. जोरदार पावसामुळे ऊस शेती आडवी झालेली पहावयास मिळत आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील भागात आजपर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस आहे. आधीच कृष्णा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याने टेंभू योजनेच्या माध्यमातून या भागातील तलाव, बंधारे भरून घेण्यात आले होते. त्यामुळे या पावसाने लगेच पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात तीन मंडळात मध्यरात्री अतिवृष्टी झाली आहे. कुरुंदा 93, हयातनगर 89, आंबा मंडळात 72 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कापणीला आलेल्या सोयाबीनच्या उभ्या पिकात सध्या गुडघ्याइतके पाणी साचल्याचे चित्र बघायला मिळते. त्याचबरोबर नदीकाठच्या जमिनीचा सुपीक भाग देखील वाहून गेला आहे. सकाळी पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात गर्दी केली असल्याचेही बघायला मिळाले. पावसामुळे आटपाडी मधील एका घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


प्रचंड विजांचे कडकडाट आणि मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर परिसराला दणका बसला. पिकांसोबत घरे आणि विजेच्या खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ओझेवाडी परिसरात खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कासेगाव परिसरातील द्राक्ष बागेत पाण्याचे लोंढे वाहत आहेत. या परिसरातील सर्व ओढे नाले देखील ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी आले आहे. ओझेवाडी परिसरात या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून काहींच्या घरात पाणी शिरले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने विजेचे अनेक खांब कोसळल्याने परिसरातील वीज पुरवठा गायब झाला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झालाय. या पावसामुळे ग्रामीण भागात दाणादाण उडालीय. लहान नद्यांना, ओढ्याना पूर आला तर पिके आडवी झाली आहेत. या वर्षातला सर्वाधिक मुसळधार पाऊस रात्री झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरले. कन्नड तालुक्यातील करंजखेड, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात पाऊस नव्हे तर आपत्ती आल्यासारखी स्थिती होती. जोरदार पाऊस झाला. डोंगराळ भागामुळे पावसाचा पाण्याचा ओघ गावात होता. नदी नाल्यांना मोठा पूर आला. सर्व पाणी शेतात साचले तर गावात गुडघ्याच्याही वर पाणी दिसत आहे. पूर्ण रात्र नागरिकांनी जागून काढली आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस, ग्रामीण भागात उडाली दाणादाण


पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील अग्नावती प्रकल्प गेल्या जुलै महिन्यातच यावर्षी पावसाने तुडुंब भरला आहे. त्यानंतर अग्नावती नदीला सप्टेंबरपर्यंत चार वेळेस महापूर येऊन गेला, तसेच दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्नावती नदीला पुन्हा एकदा महापूर आल्यामुळे अनेक छोटी मोठी दुकाने वाहून गेली. छोट्या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला व्यवसायिक व इतर व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तसेच गावातील अग्नावती नदीवर पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. नदीपात्रातील छोट्या मोठ्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानातील सामानाची नासधूस झालेली आहे. त्यामुळे सर्व दुकानदारांनी त्वरित पंचनामा करून मदत मिळण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.


हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहिले आहेत. त्याचबरोबर कुरुंदा गावाच्या मध्यभागातून वाहणारी जलेश्वर नदीला देखील पूर आला आहे. ही नदी गावाच्या मध्य भागातून वाहत असल्यामुळे काही प्रमाणात नदी शेजारील असलेल्या परिसरामध्ये कमरे इतके पाणी शिरले होते. मात्र, पावसाने पहाटेच्या सुमारास विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.


बुलढाणा जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने जिल्हयातील 81 पैकी 65 लघुप्रकल्प तर जिल्ह्यात सातही मध्यम प्रकल्प 100 टक्के भरलेत आणि जिल्ह्यातील तिन्ही मोठे प्रकल्प ऑगस्ट मध्येच भरल्याने त्यातून विसर्ग सुरु आहे. जिल्ह्याची सिंचन क्षमता 533.56 दशलक्ष घन मीटर असून सध्या जिल्ह्यात 479.62 दशलक्ष घनमीटर इतका म्हणजे 89.89 टक्के साठा आहे. एकंदरित जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने यंदा सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.


Rural News | कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर ट्रक वाहून गेला | माझं गाव माझा जिल्हा