सांगली : आटपाडी तालुक्यात काल दुपारपासून अतिवृष्टी झाली. वादळी पावसाने अनेक पूल पाण्याखाली गेले. यात ओढ्या पलीकडे चरायला गेलेल्या 80 भर मेंढ्या अडकून पडल्या होत्या. पुलावर पाणी असल्याने डोक्यावर एकएक करत आणण्याची किमया काही मेंढपाळांनी करून दाखवली आहे.


दिघंची येथील भाकरओढा पूल देखील पाण्याखाली गेला. भाकरओढ्याच्या पलीकडे मेंढ्या चरण्यासाठी गुंडाराज ढोक, सुरेश ढोक,गोविंद रणदिवे हे तिघे गेले होते. पावसाला सकाळ पासूनच सुरुवात झाली होती. त्यात दुपारी झालेल्या संततधार पावसाने येथील भाकरओढ्याला पाणी आले. त्यामध्ये पूल पाण्याखाली गेला व वाहतूक बंद झाली. आता या सर्व मेंढ्या घरी सुरक्षित घेऊन जाण्यासाठी या तिघांची धडपड सुरू झाली परंतु पाऊस कमी होण्याची लक्षणे नव्हती व पाणी देखील वाढत चालले होते.


Maharashtra Rain Update | राज्यात आजही मुसळधार पाऊस; अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती


वाहत्या पाण्यातून मेंढ्या तशाच नेल्या तर वाहून जाण्याचा मोठा धोका होता. अखेरीस गुंडाराज ढोक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या खांद्यावरून एक एक करत तब्बल 80 मेंढ्या पुलाच्या एका टोकावरून दुसरीकडे वाहत नेल्या. एका टोकावर सुरेश ढोक यांनी गुंडाराजच्या खांद्यावर मेंढ्या उचलून दिल्या तर पुलाच्या दुसऱ्या टोकावर गोविंद वाघमारे याने मेंढ्या उतरुन घेतल्या. आपल्या सर्वच्या सर्व मेंढ्या सुरक्षित स्थळी आपल्या घरी नेल्या.


आपल्या जीवाची बाजी लावून गुंडाराज ढोक,सुरेश ढोक,गोविंद रणदिवे या तिघांनी सर्वच्या सर्व मेंढ्या सुरक्षित आणल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर थकव्या ऐवजी जीव लावलेल्या मेंढ्या सुरक्षित झाल्या याचा आनंद जाणवत होता. जीवापाड माया लावून सांभाळ केलेल्या तब्बल 80 मेंढ्या पुलाच्या पलीकडे अडकल्या. आपण पाळलेल्या प्राण्यांविषयी असणारा जिव्हाळा व लावलेली माया दिघंची येथील या घटनेने अधोरेखीत झाली आहे.