Maharashtra Rain Update : हवामान विभागाकडून राज्यामध्ये मुंबई आणि कोकण विभाग सोडून 29 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आज (10 मे) पुणे, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, जालना या ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर झाला आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यांमध्ये झंझावाती प्रचार सुरू आहे. त्यामुळे राज्यभर महाविकास आघाडीसह महायुतीमधील नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र पावसाने या सभांवर पाणी फेरलं आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे सभा रद्द करण्यात आल्या आहेत. 


उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द करण्यात आला आहे. आता ते सायंकाळी छत्रपती संभाजी नगरकडे प्रयाण करणार आहेत. मात्र, छत्रपती संभाजी नगरची सभा सुद्धा खराब हवामानामुळे होते की नाही? याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलं  आहे. उद्धव ठाकरे यांची जालन्यामध्ये कल्याणराव काळे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे सभा रद्द करण्यात आली आहे. 


पुण्यातील अनेक सभांवर टांगती तलवार 


दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा आज अनेक नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुण्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सभा रद्द करण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि आदित्य ठाकरे हे वडगाव शेरीमध्ये प्रचार सभा घेणार होते. मात्र, मुसळधार पावसामुळे महाविकास आघाडीची सभा रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांची सुद्धा आज पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा होत आहे. मात्र, ही सुद्धा सभा आता अडचणी सापडली आहे. राज यांच्या सभेवर अवकाळी पावसाची टांगती तलवार आहे. 


अजित पवारांची पावसात सभा


अजित पवार यांची सभा नगरमधील पारनेरमध्ये होती. यावेळी पावसामध्ये अजित पवार यांची सभा सुरू झाली. त्यामुळे एकंदरीत राज्यातील अनेक सभांवर पाणी फेरलं गेलं आहे. राज्यात पुढील पाच दिवस 29 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर देखील होतो का? याची चर्चा आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये रणरणत्या उन्हाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. मात्र, आता चौथ्या टप्प्यांमध्ये उन्हाची चिंता नसली, तरी अवकाळी पावसाची मात्र टांगती तलवार असणार आहे. 


दरम्यान, पुण्यात दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पुढील तीन दिवस पुण्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या 10 दिवसांपासून पुण्याचं कमाल तापमान 38 ते 40° सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. आज पुण्यात अनेक ठिकाणी सभा आहेत, तर 13 तारखेला मतदान आहे. पावसामुळे मतदानात फरक पडतो का? आजच्या सभांवर पावसाचा कसा परिणाम होणार बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.


झाड कोसळलं, महेश लांडगे मदतीला धावले


पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर विमाननगर परिसरात एक झाड थेट वाहनावर कोसळलं. त्या वाहनामागून भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे येत होते. त्यांच्या समोरच्या वाहनावर झाड कोसळल्याचं पाहून लांडगे त्यांच्या मदतीला धावले. लांडगेंसह उपस्थितांनी वाहनातील सर्वांना बाहेर घेतलं. सुदैव इतकंच की झाड छोटं होतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वाहनातील कोणालाही मोठी इजा झाली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या