Pune Weather News : पुण्यातील (Pune) अनेक भागात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात पूर्वमौसमी पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. दरम्यान, पावसामुळे पुण्यातील उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुण्यात आज लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांनी सभांचे आयोजन केले होते, या सभांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे (Pune Rain) या सभा होतील का? असा प्रश्न निर्माण झालाय.
पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण
पुण्यात आज (दि.10) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर गेल्या तासाभरापासून पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे स्वारगेट परिसरातील रस्त्यांवर पाणी वाहू लागले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लोकांना उकाडा जाणवत होता. ऊनामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. मात्र, आजच्या पावसामुळे पुण्यातील वातावरणात गारवा निर्माण झालाय. पुण्यातील लोक पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र, राजकीय पक्षांना याचा फटका बसलाय. कोंढवा परिसरात अजित पवारांची सभा होणार आहे. मात्र,पावसामुळे सभा पार पडणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.
जालन्यात पावसाची हजेरी, उद्धव ठाकरेंची सभा रद्द
जालना जिल्ह्यातही पाऊसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडत असल्यामुळे हवामान खराब झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॅाप्टर उड्डाण करून शकत नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॅाप्टरने जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघीडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जालना येथे जाणार होते.
नगर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले
पुण्याशिवाय अहमदनगर, सांगली आणि संभाजीनगर जिल्ह्यालाही पावसाने झोडपले आहे. सांगलीत अवकाळी पावसाने हजेरी लावलीच शिवाय, शेतकऱ्यांना गारपीटीचाही सामना करावा लागला आहे. आंबा, भाज्यासह अनेक पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे नागरिकांना उकाड्यापासून सुटका झालीये. मात्र, शेतकऱ्यांना गारपीटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनाही फटका बसणार आहे. अहमदनगर शहरासह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
विदर्भ -मराठवाड्यातही पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
संभाजीनगर, सांगली , नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान