
Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस, बहुतांश ठिकाणी पावसाची दडी; आज विदर्भात यलो अलर्ट
राज्यात काही भागातच पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रातील काही भागातच पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, राज्यात मुंबईसह उपनगर, ठाणे जिल्ह्यासह कोकणात चांगला पाऊस पडत आहे. तसेच अन्य काही जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या राज्यातील काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसानं ओढ दिल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुासर महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही गंभीर परिस्थिती असून, तिथं सरासरीच्या 38 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं राज्यात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.
मुंबईत जोरदार पाऊस, मालाडमध्ये झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू
मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं जुनाट झालेले वृक्ष कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मालाड पूर्वेकडील दप्तरी रोड परिसरातील कासमबाग परिसरात एक झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मात्र, या दुर्घटनेत दोन महिला आणि एक बालक जखमी झाले आहे. जखमी झालेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून जखमींना जवळील जीवन ज्योती या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिंदाबाई अहिरे असं मृत महिलेचं नाव आहे.
यामध्ये रेखाबाई सोनवणे (46 वर्ष) आणि रुद्र सोनावणे (तीन वर्ष) अशी जखमी झालेल्यांची नावे असून कांदिवली येथील जीवन ज्योती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात दमदार पावसाची हजेरी
वरुड तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. मात्र, आता या पावसामुळं शेती कामांना वेग येणार आहे. शेन्दुरजना घाट येथे नाल्याला पुर आल्याने तिवसाघाट-शेंदूरजनाघाट संपर्क तुटल्याने वाहतूक खोळंबली होती. देवना आणि जीवना नदीला पुर आला आहे. वरुडच्या चुडामन नदीला पहिला पुर आला. शेतात पाणी साचल्याने नुकतेच पेरणी झालेली पिकं पाण्याखाली आली आहेत. वरुड तालुक्यात कुठेही नुकसान झाले नसल्याचे नायब तहसीलदार पंकज चव्हाण यांनी सांगितले.
राज्यात पावसानं दिली ओढ, शेतीची कामं खोळंबली
राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिलीय. त्यामुळं शेतीची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. पेरण्या लांबल्याने शेतकरी हैराण झालाय. वरुणराजाची कृपा व्हावी यासाठी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात अनोखा विवाह सोहळा पार पडला. या गावात चक्क गाढवांचे लग्न लावण्यात आले. गाढवाचे लग्न लावल्याने पाऊस पडतो अशी इथल्या नागरिकांचा समज आहे यातूनच हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. गावातील श्री शिवचलेश्वर मैदानात हा विवाह पार पडला. त्यानंतर संपूर्ण गावातून गाढवांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गाव जेवणाचे देखील आयोजन करण्यात आले होते. लग्नाची संपूर्ण तयारी देखील गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन केली. त्यासाठी लागणार खर्च देखील वर्गणीतून गोळा करण्यात आला होता.
लाचूर जिल्ह्यात पावसाची दडी
लातूर जिल्ह्यात काही भागात पाच ते सात दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस (Rain) खूपच कमी ठिकाणी झाला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ पावसाची वाट पाहाणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे मात्र अजूनही आभाळाकडे लागून राहिले आहेत. त्यात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस, मराठवाड्यात गंभीर स्थिती; वाचा कोणत्या विभागात किती पाऊस?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
