Maharashtra Rain : भंडारा गोंदियात जोरदार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम
राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भंडारा आणि गोंदियाचा समावेश आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आला आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडं मुंबईसह परिसरात देखील चांगला पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह परिसरात चांगला पाऊस
मुंबईसह परिसरात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईसह उपनगरांतही चांगला पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.
भंडारा-गडचिरोलीचा संपर्क तुटला
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
वैनगंगा नदीला पूर आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं आणि गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे लाखांदूर तालुक्यातील वाहणाऱ्या चूलबंद नदीवरील सर्व पुल पुराच्या पाण्याखाली आले आहेत. यात लाखांदूर, भागडी चीचोली, मांढाल दांडेगावर, बोठली धरमापुरी, ताई बार्व्हा, दिघोरी मोठी पालांदुर पुलाचा समावेश असून प्रत्येक पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने तालुक्यातील अनेक गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. तर लाखांदूर ते वडसा या राष्ट्रीय महामार्गावरील चाप्राळ ते सोनी रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने भंडारा ते गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. तर लाखांदूर तालुक्यातील आवली, पारसोडी,पाऊलाडवणा, या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून पुराचा धोका वाढलेला आहे. चुलबंद नदीच्या पुलावर पुराचे पाणी चढल्याने पुल पाण्याखाली आले आहे. त्यामुळे लाखांदूर ते पवनी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. गावाला पुराच्या पाण्याने वेढले असून अनेक घरे पाण्याखाली आले तालुका प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस
नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात चांगला पाऊस पडत आहे. यामुळं नदी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, गंगापूर धरणामधून आज 6 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व गंगापूर पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाल्याना काही प्रमाणात पूर आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज सकाळी 6 वाजता 3000 क्युसेकने गंगापूर धरणातून विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.