Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा इशारा  

Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात पावसानं हजेरी लावली. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Aug 2022 02:27 PM
भंडाऱ्यासह गोंदियात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट

Bhandara Rain : सध्या राज्यात पावासाचा (Rain) जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र पाऊस कोसळताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. भंडाऱ्यासह गोंदियात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आज हवामान विभागानं भंडाऱ्याला यलो अलर्ट दिला आहे. आधीच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे मठं नुकसान झालं होते. आता सकाळपासून पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आस्मानी संकट येण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतलीआहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, आज काहीसा पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज आणि उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


दरम्यान, मागील दोन दिवसारत राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. सध्या धरणांमधून नद्यांमध्ये विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.



औरंगाबादमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी 


औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर शहरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे. तर वाळूज जवळील लिंबेजळगाव-तुर्काबाद परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सोबतच शहरात सुद्धा काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.


कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ


कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पातळी 30 फुटांवर गेली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सांगली शहराच्या सूर्यवंशी आणि आरवाडे प्लॉट या पूर पट्ट्यामधील सहा कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. सूर्यवंशी प्लॉट मधील दोन घरात पाणी घुसले आहे. आणखीन पाण्याची पातळी वाढली तर सांगलीच्या विस्तारित भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरपट्ट्यातील नागरिकांनी स्वतः हुन सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे, असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी जनतेला केले आहे. पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करु नये असे आवाहन केले आहे.


उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरु 


सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहेत. धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्याच्या परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाच्या संततधारेमुळे उजनी (Ujani) आणि वीर धरण (Veer Dam) ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत 50 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला आहे. 


नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


उजनी आणि वीर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरु असल्यानं पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवल आले आहे. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीमुळं प्रशासनाने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.