Sangli News: विशाल पाटील सांगलीचे खासदार म्हणून निवडून आल्यापासून भाजपने पक्षप्रवेशासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ऑफर दिल्या. विशाल पाटलांनी भाजप प्रवेशाबाबत नेहमी नकारघंटा कळवली. त्यामुळे आता भाजपकडून विशाल पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपत घेण्यास सुरुवात केली आहे. आता विशाल पाटील यांना निवडून आणण्यात वाटा असलेले माजी नगरसेवक मनोज सरगर येत्या सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. मनोज सरगर यांचा भाजप प्रवेश करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित राहणार असून चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश होणार आहे. सांगलीत संजय नगरमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.
मनोज सरगर यांच्या माध्यमातून भाजपने एक प्रकारे काँग्रेस आणि खासदार विशाल पाटील यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का दिला आहे. संजयनगरसह सांगली भागामध्ये मनोज सरगर यांची ताकद मानली जाते. हीच ताकद आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात आणि केंद्रात देखील सत्ता नसल्याने कार्यकर्ते बांधून ठेवणे हे खासदार विशाल पाटील यांच्यासमोर आव्हान आहे.
चुलत वहिनीनंतर खंद्या समर्थकाने साथ सोडली
जयश्री मदन पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी आहेत. त्यानी देखील काही दिवसांपूर्वी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या वसंतदादा कुटुंबातील जयश्री पाटील या पहिल्या व्यक्ती आहेत. जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा विशाल पाटील यांच्यासाठी मोठा धक्का होता. आता त्या पाठोपाठ विशाल पाटलांचे खंदे समर्थक मानले जाणारे मनोज सरगर भाजप प्रवेश करत आहेत.
कोण आहेत मनोज सरगर?
सांगली जिल्ह्यातील सक्रिय, ऊर्जावान आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे तरुण नेतृत्व मनोज सरगर आता भाजपत प्रवेश करत आहेत. सरगर यांनी सांगली महापालिकेत एक कार्यकाळ नगरसेवक म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्षपद भूषवून त्यांनी असंख्य तरुणांना राजकारणात संधी दिली. 2020 मध्ये त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करून नेतृत्व क्षमतेची छाप पाडली. गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेस नेते खासदार विशाल पाटील यांचे विश्वासू सहकारी राहिले असले, लोकसभा निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता नव्या राजकीय वाटचालीसाठी त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पाठीशी नगरसेवक, सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्यासह अनेक प्रभावी लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या