Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह परिसरात पहाटेपासूनचं पावसाला सुरुवात, कोकणसह मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार
पहाटेपासूनचं मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Background
Maharashtra Monsoon Rain LIVE : आज पहाटेपासूनचं मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान, येत्या 4 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई ठाण्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या काही भागात सुरुवातील पावसानं चांगली हजेरी लावली होती. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, पावसानं पुन्हा दडी मारली आहे. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
पेरण्या रखडल्या
एकीकडे हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे राज्यभरात पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आलाय, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी झाली आहे. राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 17 जूनपर्यंत केवळ एक लाख 47 हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.
Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी
Aurangabad Rain Update: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण रविवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. वैजापूर तालुक्यातील पोखरी गावात पावसाने हजेरी लावली आहे. तर पैठणमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे. 























