सावधान! 16 ते 21 ऑगस्टदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा इशारा
सध्या राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवसात 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून ही माहिती देण्यात आली आहे.
संभाव्य पर्जन्यमानः
कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता.
मराठवाडा मध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता. वीज चमकणे, गडगडाट, वादळी वारे (40) 50 किमी/ताशी) यांची शक्यता.
मच्छीमारांसाठी इशारा
कोकण किनारपट्टी
16 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50 ते 60 किमी/ताशी वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश
सचेत ॲपमार्फत नागरिकांना सूचना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी तसेच कुंडलीका नदी व रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र 24x7 सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. 022-22027990 किंवा 022-22794229 किंवा 022-22023039 तसेच मोबाईल - 9321587143 उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
राज्यभरात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार
राज्यभरात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणात हवामान विभागाने हाय अलर्ट दिले आहेत. मराठवाड्यात पुढील चार दिवस काही जिल्ह्यात पावसाची हजेरी राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुढील 5 दिवस हायअलर्ट, कोकणपट्टीसह कुठे काय स्थिती? IMDनं सांगितलं...




















