Maharashtra Politics Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला आव्हान; याचिकेवर 11 जुलै रोजीच होणार सुनावणी
Maharashtra Politics Shivsena : शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. 11 जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे.
Maharashtra Politics Shivsena : राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाविरोधात आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला आव्हान देणारी याचिका शिवसेनेच्यावतीने आज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. या याचिकेवर 11 जुलै रोजीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता राज्याचे लक्ष पुन्हा एकदा 11 जुलैकडे लागले आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज नवीन याचिका दाखल केली. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना ही घोषणा कशी होऊ शकते? असा प्रश्न या याचिकेत उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेकडून अॅड. देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. याचिकेत विधानसभा अध्यक्षांची निवड, बहुमत चाचणीच्या प्रक्रियेलाही आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 11 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत या याचिकेचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात याआधीच महाराष्ट्रातील सत्तांतराशी संबंधित याचिका प्रलंबित आहेत. त्यावर आता 11 जुलै रोजीच सुनावणी होणार आहे. आता त्यात सुभाष देसाई यांच्या या याचिकेची भर पडली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या कारवाईला एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टात येत्या 11 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याशिवाय, शिंदे गटाने शिवसेनेने विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी यांच्या केलेल्या नियुक्तीलाही आव्हान दिले आहे. यासह इतर याचिकांवरही सुप्रीम कोर्टात 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार कोसळले. मात्र, त्यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर तीन दिवसांनी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. त्याशिवाय विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकदेखील पार पडली.
दरम्यान, विधीमंडळात या घडामोडी सुरू असताना बंडखोर गटाने आमचाच शिवसेना पक्ष खरा असल्याचे सांगत निवडणूक चिन्हावरही दावा करण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे गटात ठाणे, नवी मुंबईतील बहुतांशी नगरसेवक सामिल झाले आहेत. तर, काही माजी लोकप्रतिनिधीदेखील शिंदे यांच्या गटाच्या मार्गावर आहेत. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्ह वाचवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.