Shiv Sena :  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधान परिषदेसाठी आपल्या गटातील आमदाराचे नाव प्रतोद म्हणून सुचवल्यानंतर दुसरा मोठा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. शिवसेनेच्या संसदीय गटाच्या नेतेपदावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 


शिवसेना-शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील आणि संसदेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेतले आहे. 


उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेनं परिषदेत विप्लव बजोरिया यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे आमदार आहे आणि सभागृहात प्रतोदचा व्हिप हा महत्वाचा असतो.  त्यामुळे आता विप्लव बजोरियांचा व्हिप हा उद्धव ठाकरेंना मान्य करावा लागणार का, अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे दिल्लीतही शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. 


संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहेत. त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यानंतर आणखी एक धक्का ठाकरे गटाला देण्यात येणार 


संजय राऊतांची उचलबांगडी


शिवसेना शिंदे गटाकडून संसदीय पक्षाच्या नेतेपदी संजय राऊत यांची  उचलबांगडी करण्यात आली आहे. राऊत यांच्या ऐवजी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र संसदेच्या संबंधित समितीला दिले असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. लोकसभेत शिंदे गटाकडे 13 खासदार आहेत. तर, 5 खासदार ठाकरे यांच्या बाजूने आहेत. तर, राज्यसभेतील तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. यामध्ये संजय राऊत, अॅड. अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. हे तिन्ही खासदार उद्धव यांच्यासोबत आहेत. आता, संसदीय नेता बदलल्यास ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटाचा व्हीप मानवा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: