Maharashtra Assembly Session Shiv Sena :  राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) सुरू झाले असून दुसऱ्या दिवशी आता मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्ह दिसू लागली आहे. ठाकरे गटाकडून कोंडी होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव खेळला आहे. विधानसभेनंतर आता विधान परिषदेत त्यांनी प्रतोद बदलला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे. विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड करण्यात आल्याचे पत्र त्यांनी दिले आहे. शिंदे गटाचा (Shinde Faction Shiv Sena) प्रतोद नेमल्यास खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकनाथ शिंदे यांचा 'आदेश' मानावा लागणार आहे.


निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील गटाला शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटताना दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभेतील 40 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, विधान परिषदेतील बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. शिवसेनेतील फुटीमुळे अभूतपूर्व राजकीय पेच निर्माण झाला आहे. विधानसभेत ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि शिंदे गटाकडून भरत गोगावले हे प्रतोद आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अधिक स्पष्टता येणार असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले. तर, आता विधान परिषदेतही शिंदे गटाने प्रतोदाची निवड केल्याने आणखीच राजकीय पेच निर्माण झाला आहे. 


विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसे पत्र विधान परिषद उपसभापतींना देण्यात आले. शिवसेना विधिमंडळ गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रतोद नेमण्यासाठी हे पत्र दिले आहे. बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड झाल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार, अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. 


ठाकरे गटाने वार करण्याआधीच शिंदेचा डाव


अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे सांख्याबळ अधिक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू होता. त्यासाठी इतर घटक पक्षांसोबत चर्चा सुरू होती. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हंटले होते. त्या वक्तव्याविरोधात ठाकरे गट विधान परिषदेत आक्रमक होणार होते. मात्र, आता शिंदे यांनी प्रतोदपदाचा डाव खेळल्याने ठाकरे गट बॅकफूटला जाण्याची शक्यता आहे.