Kolhapur Politics Marathi News : बंटी उर्फ सतेज पाटील (Satej Patil) आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक....(Dhananjay Mahadik) ही दोन्ही नावं राज्याला काही नवीन नाहीत. एक काँग्रेसचा (Congress) मातब्बर नेता तर दुसरा भाजपचा (BJP) खासदार. पाटील आणि महाडिक गट कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ. आता हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते म्हणजे एकमेकांना आव्हान दिल्यामुळे. 'बिंदू चौकात या, हिशोब करु' असं आव्हान या दोन्ही गटांनी एकमेकांना दिलं असून त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं चित्र आहे. पण सतेज पाटील आणि महाडिक गटाचे खासदार धनंजय महाडिक हे एकेकाळचे कट्टर मित्र होते, आता ते राजकीयदृष्या एकमेकांना संपवण्यासाठी इरेला पेटले आहेत.
बावड्याच्या छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील (Satej Patil) आणि महाडिक (Dhananjay Mahadik) गट एकमेकांसमोर उभा ठाकलाय. बिंदू चौकात येण्याचं एकमेकांना आव्हान दिल्यानंतर त्या याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
Kolhapur Politics Marathi News | Dhananjay Mahadik : बंटी आणि मुन्ना, एकेकाळचे कट्टर मित्र
कोल्हापुरच्या राजकारणात एकेकाळी नवखे असलेली बंटी- मुन्ना ही जोडी भल्याभल्यांना घाम फोडायची. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची राजकीय एन्ट्री ही एकाच वेळची, म्हणजे 2004 सालची. त्यावेळचे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी घेतली. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे मित्र एकाच तालमीत म्हणजे महादेवराव महाडिक यांच्या तालमीत तयार झालेले. त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाचं वावडं नव्हतं.
सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या नवख्या जोडगोळीनं त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांना चांगलंच जेरीस आणलं. जिल्ह्यातील बडे नेते एका बाजूला आणि हे दोघे एका बाजूला, पण तरीही धनंजय महाडिक यांना निसटता म्हणजे 14 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.
Kolhapur Politics Marathi News | Satej Patil : सतेज पाटलांची धमाकेदार एन्ट्री
लोकसभेत अवघ्या काही मतांनी पराभव झाल्यानंतर सतेज पाटील आणि धनंजय महाडिकांनी विधानसभेची जोरदार तयारी केली. त्यावेळच्या करवीर मतदारसंघातून सतेज पाटलांनी त्यावेळचे आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्याविरोधात शड्डू ठोकला. सतेज पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या दोघांना साथ होती ती महादेवराव महाडिक यांच्या बेरजेच्या राजकारणाची. त्यामुळे सतेज पाटलांनी खानविलकरांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
Maharashtra Politics Marathi News | ताराराणी आघाडीत पहिली बिघाडी
महाडिकांना कोणत्याही पक्षाचं वावडं नव्हतं, आजही नाही. महाडिक गटाचं राजकारण हे गटकेंद्रीत राहिलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार असले तरी महादेवराव महाडिकांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून महापालिकेत आपला वेगळा गट कायम ठेवला. सुरुवातीला अपक्ष असलेल्या सतेज पाटलांना पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिलं आणि सतेज पाटलांनी पक्षीय राजकारण सुरू केलं. त्यातून ताराराणी आघाडीत नगरसेवकांच्या उमेदवारीवरुन सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात पहिली ठिणगी पडली.
सन 2008 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीने धनंजय महाडिकांना तिकीट नाकारलं आणि संभाजीराजेंना दिलं. त्यामुळे नाईलाज झालेल्या महाडिकांनी त्यावेळचे अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना मदत करत वचपा काढला. त्यावेळी सतेज पाटलांनी आपली भूमिका कायम ठेवत संभाजीराजेंना मदत केली.
Maharashtra Politics News | पक्षीय राजकारणामुळे सतेज पाटील आणि महाडिकांत दरी
महाडिकांच्या गटाच्या राजकारणापासून फारकत घेऊन सतेज पाटलांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण सुरू ठेवलं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सुरू झालेला वाद गोकुळपर्यंत पोहोचला. गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या मदतीने महाडिकांना आव्हान दिलं. गोकुळ म्हणजे महाडिकांच्या राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र. त्याचं महत्व ओळखून सतेज पाटलांनी राजकारणाचे फासे टाकायला सुरूवात केली.
Maharashtra Political News | 2014 सालच्या निवडणुकीत शरद पवारांची मध्यस्ती
जिल्ह्यात बंटी विरुद्ध मुन्ना असा वाद जोरदार रंगला असताना 2014 सालच्या निवडणुकीत मात्र त्यांना एकत्र यावं लागलं. 2014 साली राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेसवर म्हणजे सतेज पाटलांवर दबाव टाकायला सुरूवात केली. परिणामी सतेज पाटील महाडिकांना मदत करायला तयार झाले, पण या बदल्यात महाडिकांनी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत मदत करावी अशी अट सतेज पाटलांनी टाकल्याची माहिती होती.
सतेज पाटलांनी मदत केल्यामुळे धनंजय महाडिकांचा विजय सोपा झाला. पण निवडणूक झाल्यानंतर सतेज पाटलांनी आपल्याला मदत केली नसल्याचं महाडिक गटाकडून जाहीरपणे सांगण्यात आलं. विधानसभेत त्याचा वचपा काढू असं सांगण्यात आलं.
Maharahtra Satej Patil Congress Leader | सतेज पाटलांचं वाढतं प्रस्थ राष्ट्रवादीच्या डोळ्यात खुपत होतं?
विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेल्या सतेज पाटलांचं जिल्ह्यात वाढतं प्रस्थ अनेकांना खुपत होतं. त्यातही सतेज पाटील राज्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेला साताऱ्यातील राजकारणातील हस्तक्षेप राष्ट्रवादीला पटत नव्हता. त्यामुळे 2014 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाडिकांना हाताशी धरुन सतेज पाटील यांचा काटा काढण्यात आला.
2014 सालच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून राष्ट्रवादीने आपला उमेदवारच दिला नाही, तर राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या धनंजय महाडिकांच्या भावाला म्हणजे अमल महाडिकांना भाजपने उमेदवारी दिली. याचा परिणाम म्हणजे अमल महाडिकांनी सतेज पाटलांचा पराभव केला.
सतेज पाटलांना हा पराभव प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता महाडिकांना राजकारणातून संपवायचंच असा त्यांनी चंग बांधला. त्यांनी पहिला घाव महादेवराव महाडिकांवर घातला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत माहिर असलेल्या महादेवराव महाडिक यांच्याविरोधात सतेज पाटलांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि विजय मिळवला. त्यानंतरच्या 2019 सालच्या विधानसभेत दक्षिण कोल्हापूरमधून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव केला.
Maharahtra Congress Leader | 'आमचं ठरलंय' म्हणत महाविकास आघाडीची पायाभरणी
सतेज पाटलांनी कोल्हापूर महापालिकाही महाडिकांच्या ताब्यातून काढून घेतली. हसन मुश्रीफ यांच्या मदतीने जिल्हा बँकही ताब्यात घेतली. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटलांचा विरोध असतानाही राष्ट्रवादीने पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. त्यावेळी 'आमचं ठरलंय' म्हणत सतेज पाटलांनी महाडिक विरोधकांना एकत्रित केलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज आणि शिवसेना अशी आघाडी करत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून आणलं. यावेळी मात्र त्यांनी कुणाचाही दबाव घेतल नाही.
Maharahtra Gokul election | गोकुळही ताब्यात घेतलं
महाडिक म्हणजे गोकुळ आणि गोकुळ म्हणजे महाडिक असं समीकरण असताना सतेज पाटलांनी हे आव्हानही स्वीकारलं. गेल्या निवडणुकीवेळी झालेल्या चुका सुधारत सतेज पाटलांनी गोकुळची निवडणूक लढवली आणि ती ताब्यात घेतली. महाडिक गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.
Dhananjay Mahadik | महाडिक गटाला नवसंजिवनी
जिल्ह्याच्या राजकारणातून महाडिक गट संपला अशी चर्चा होती. एकापाठोपाठ महादेवराव महाडिक, अमल महाडिक, धनंजय महाडिक यांना पराभव पत्करावा लागला. शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडावं लागलं.
भाजपचं कोल्हापूरवर विशेष लक्ष आहे. कोल्हापूरच्या राजकारणात भाजपला वर्चस्व मिळवायचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि ते खासदार झाले. त्यामुळे महाडिक गटाला नवसंजिवनी मिळाली.
Maharahtra Kolapur Election | आता राजारामचा आखाडा
सतेज पाटील आणि महाडिक गटाचा वाद आता राजाराम कारखान्यापर्यंत पोहोचला आहे. या कारखान्यावर गेल्या अनेक वर्षांपासून महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या वारसा आता अमल महाडिक आणि धनंजय महाडिक चालवत आहेत. त्यामुळे काहीही करुन हा कारखाना महाडिकांकडून काढून घ्यायचा असा चंग सतेज पाटील यांनी बांधला आहे. गेल्या वेळीही त्यांनी हा प्रयत्न केला होता, त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं.
एकेकाळचे कट्टर मित्र असलेले, अनेकांना जेरीस आणलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू आहेत. सतेज पाटील आणि महाडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक हे एक युद्धाप्रमाणे आहे. त्यामुळे राजकारणातून कोण संपणार, कोण तरणार हे येत्या काळात स्पष्ट दिसेल.
ही बातमी वाचा: