Sadanand More : डान्सर गौतमी पाटील (gautami patil) आणि इंदुरीकर महाराज यांच्यावरून सुरू असलेला वाद शमण्याची चिन्हं दिसत नाही. प्रत्येकवेळी एकमेकांवर आरोप सुरुच आहेत. मात्र आता ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी दोघांवरही टीका केली आहे. गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज या दोघांनाही त्यांच्या क्षेत्रातील लोक नावं ठेवतात, असं मत सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
सदानंद मोरे यांचा या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की, लावणी आणि किर्तन या दोन्ही वेगळ्या परंपरा आहेत. या दोन्ही परंपरा त्यांच्याठिकाणी उत्तम आहेत. मात्र या दोघांनीही ही परंपरा बिघडवली आहे. गौतमीने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही महाराजांना नावं ठेवतात. दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
सदानंद मोरे यांनी सांगितले की, लावणी आणि किर्तनाला माहाराष्ट्रात उज्वल परंपरा आहे. लावणीत श्रृंगार रस आहे आणि त्यासोबतच आनंदही आहे. लावण्यांना अध्यात्माची उबही होती. मात्र आता लावणीचा प्रकार बदलला आहे. काही पारंपारिक लावण्यांचे कार्यक्रम अजूनही होतात. मात्र त्यापेक्षा लावणी वेगळ्या पद्धतीने दाखवली जात आहे. खरी लावणी लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटले.
इंदुरीकर महाराज यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, महाराजांच्याच संप्रदायाच्या लोकांना त्यांचं किर्तन आवडत नाही ते लोकंही त्यांच्या किर्तनावर टीका करत असतात. किर्तनाचा खरा बाज जपणं महत्वाचं आहे. त्यातून समाज प्रबोधन व्हायला पाहिजे. त्यासोबतच किर्तनाला अनेकांनी हलक्यात घेऊ नये. इंदुरीकर महाराज अनेक घडामोडींवर भाष्य करत असतात. ही एक चांगली गोष्ट आहे मात्र पारंपरिक किर्तन काय असतं हेदेखील त्यांच्या सादरीकरणातून कळणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.
कला जपणं कलाकाराची जबाबदारी...
किर्तन आणि लावणी किंवा कोणतीही कला असो ती जपणं त्या कलाकाराची जबाबदारी असते. किर्तन आणि लावणी या महाराष्ट्रात परंपरा आहे त्याचं जनन करुन ते पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणं महत्वाचं आहे. मात्र पुढच्या पिढीपर्यंत पोहचवताना ती योग्य आणि चांगल्या पद्धतीने पोहचवणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी प्रत्येक कलाकाराची आहे, असं ते म्हणाले.
संबंधित बातमी-