Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. या निवडणुकांना अजून जवळपास एक वर्ष बाकी आहे. परंतु, त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या रणनीतींच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारती होती. 2019 ला महाराष्ट्रात भाजपला 23 जागा (27.59 टक्के), काँग्रेसला एक, राष्ट्रवादीला चार, एआयएमआयएमला एक आणि शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या.  


आता लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कोणाला फायदा?


इंडिया टुडेसाठी सी-व्होटरने एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आता लोकसभा निवडणूक झाल्यास यूपीएला (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी) 34 जागा मिळू शकतात. म्हणजेच एकूण मतदानाच्या 48 टक्के मतदान यूपीएच्या खात्यात जाऊ शकते. आता निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी  आणि काँग्रेसला भरघोस यश मिळू शकेल, असे या सर्वेक्षणातून समोर येत आहे. तर हा सर्व्हे एनडीएसाठी (भाजप आणि शिंदे गट) मोठा धक्का ठरू शकतो. 


विशेष म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि महाराष्ट्रत महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना आपल्याच पक्षातील नेत्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात गेले आणि फ्लोअर टेस्टपूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा दिला. नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि ते मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात ही नवी राजकीय आघाडी तयार झाली असून, त्याची पहिली कसोटी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मानली जात आहे. 


दरम्यान, सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजपला धक्का बसणार असला तरी देशात पुन्हा भाजपची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वेनुसार, एनडीएला 543 पैकी 298 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 153 जागा मिळताना दिसत आहेत. इतर पक्षांना 92 जागा मिळू शकतात. एनडीएला जवळपास 43 टक्के मते मिळू शकतात. तर यूपीएला 29 टक्के आणि इतर पक्षांना 28 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 


सर्वेक्षणानुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 284, काँग्रेसला 68 आणि इतरांना 191 जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजपला 39 टक्के मते मिळत आहेत, तर काँग्रेसला 22 टक्के आणि इतरांना 39 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.  


महत्वाच्या बातम्या


Lok Sabha Election : आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा, जाणून घ्या आकडेवारी